Friday, April 26, 2024
Homeनाशिक११ हजार ८०० बस गाड्यांना ‘व्हीटीएस’ ची प्रतीक्षा

११ हजार ८०० बस गाड्यांना ‘व्हीटीएस’ ची प्रतीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

प्रवासी सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीची (व्हेइकल ट्रॅकिंग अ‍ॅण्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम) राज्यातील तब्बल ११ हजार ८०० बस गाड्यांना प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी केवळ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने हे काम नक्की केव्हा पूर्ण होईल, याबाबत महामंडळच साशंक आहे. एसटी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असूनही प्रवासी सुरक्षेबाबत महामंडळ गंभीर नसल्याचेच हे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील देवळा येथील मेशीजवळ परिवहन महामंडळाच्या बस आणि खासगी रिक्षाचा भीषण अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाला होता.

एसटी बस नेमकी कुठे पोहोचली, बस कुठे थांबली आहे, याची त्याच क्षणी माहिती मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. स्थानकात बस येण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहण्यासाठी विशेष मोबाइल अ‍ॅपही सुरू करण्याचे नियोजन महामंडळाने केले होते.ऑगस्ट २०१९ मध्ये महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजार गाड्यांना पुढील सहा महिन्यांत ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टप्प्याटप्याने ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले.

गेल्या महिन्यात व्हीटीएस यंत्रणा आणि प्रवासी माहिती फलकामध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्या.यामुळे काही आठवडे व्हीटीएस यंत्रणा बसवण्याचे काम मंदावले.२० ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आगामी सहा महिन्यांत महामंडळातील १८ हजार बसवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे आता पुढील अवघ्या एका महिन्यात ११ हजार बसमध्ये ही यंत्रणा सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे.

प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. यामुळे टॅक्सीसह अन्य प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांमध्येही व्हीटीएस बसवण्यात येत आहे. राज्यातील ६११७ एसटीमध्ये व्हीटीएस यंत्रणा लावण्यात आली. तसेच ७८ ठिकाणी अत्याधुनिक प्रवासी माहिती फलक बसवण्यात आले.उर्वरित बसमध्येही ही सुविधा लवकरच सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या