Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘तरुणांनो तुमचे भविष्य तुमच्या हाती’

Share

नाशिक । गोकुळ पवार :

नुकत्याच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यभरात पक्षीय हालचाली सुरू झाल्या आहेत. देशात तरुणांची संख्या अधिक असल्याने निवडणुकांचा निकाल तरुणाईच्या निर्णयावर अधिक दिसून येतो. यामध्ये शहरी तरुणाईबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही सक्रिय होताना दिसतो.

दरम्यान राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांचे फटाके वाजणार असल्याने प्रचाराचा नारळ फुटला आहे; तर एकीकडे देशात आर्थिकमंदी सुरू असल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. दरम्यान आगामी निवडणुका तरुणाईवर आधारित असल्याने युवा मतदार कुणाला कौल देईल हे लवकरच स्पष्ट होईल. परिणामी तरुणांना रोजगार, शिक्षण देणार्‍या सरकार राज्यात स्थापन होईल अशी आशा आहे. एकूणच परिस्थिती बघितली तर राजकीय पक्षांच्या प्रचाराला देखील तरुणाईच अधिक दिसून येते. त्यात ग्रामीण तरुणांचा सहभाग प्रकर्षाने जाणवतो.

आज मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील तरुण राजकीय क्षेत्रात अद्याप फारसा ठसा उमटवू शकलेला नाही. याचे कारण राजकीय नेतृत्व करण्यासाठी त्याच्याकडे योग्य पार्श्वभूमी नसल्याने किंवा तेथील नेतृत्व तरुणाईला दाबण्याचे काम करीत असते. परंतु शिक्षित असलेला तरुण इतर लोकांना एकत्रित करून संघटन उभारण्याचे धाडस करताना आज दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युवा फक्त मतदान करणार नसून नेतृत्वदेखील करणार असल्याचे दिसून येत आहे.

आजचा तरुण हुशार असून त्याला हक्काची जाणीव होत आहे. यासाठी त्याच्या हक्कांवर कुठे गदा येत असेल, तर त्यासाठी वेळीच आंदोलने करतांना देखील होत आहे. राज्यात अनेक पक्षांचे नेतृत्व तरुणाकडे आहे. जसे शिवसेनेचे आदित्य ठाकरे, वंचितचे सुजात आंबेडकर, नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणे राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी नावे सांगता येतील. परंतु नेतृत्वात सामान्य तरुण कुठे आहे असा प्रश्न पडतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत राज्यातील तरुण मतदानाची दिशा पालटणार हे नक्की..

लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होत असते. शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायला हवे. तसेच ग्रामीण भागात अद्यापही विकास फारसा झालेला नाही. त्यासाठी गावाचा विकास करणार्‍या उमेदवाराला प्राधान्य दिले पाहिजे.
-सुनील महाले, युवा शेतकरी, त्र्यंबकेश्वर

देशात आर्थिक मंदी वाढत चालली असून, तरुणांना रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांनी एकत्र येत विकासाच्या मुद्याला हात घालणार्‍या पक्षाला तसेच उमेदवाराला आपला कौल द्यावा. त्यामुळे आता बदल गरजेचा आहे.
-अमोल निकम, विद्यार्थी, नांदगाव

राज्यात अनेक पक्षांचा आश्वासनावर भर असतो. विकासाच्या नावाने जनतेला झुलवत ठेवण्याचे काम ही मंडळी करत असतात. ग्रामीण भागाचा विकास हा युवा उमेदवारच करत असतात. त्यामुळे सक्षम असणारा उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांचे ‘विचारपूर्वक मतदान’ उद्याच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे.
-विजय पानगव्हाणे, युवा कार्यकर्ता, निफाड

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!