Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘कमळा’बाई म्हणते दार उघड बये …दार उघड

Share

नाशिक । कुंदन राजपूत

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमध्ये आई भवानीला ‘दार उघड बये … दार उघड’ अशी साद घातली आणि राज्यात युतीची सत्ता आली होती. बाळासाहेब ‘प्रेमाने’ भाजपला ‘कमळा’बाई म्हणत. दोन दिवसांपूर्वी नाशकात भाजपच्या महाजनादेश यात्रेची सांगता झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनी निवडणुकीत भाजपला आशीर्वाद द्या, अशी साद घातली. ‘कमळा’ बाईने दार उघड बये ..दार उघड असा कौल मागितला. फरक ऐवढाच की, बाळासाहेबांनी ‘युती’साठी दान मागितले होते. मात्र, कमळाबाईने ‘स्वबळा’वर सत्ता येऊ दे असे साकडे घातले, अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाशिक जिल्ह्याने नेहमी परिवर्तनाच्या हाकेला साद दिली. मग शेतकरी पक्षाचे शरद जोशी यांचे आंदोलन असो की शरद पवार यांच्या समाजवादी कँग्रेसचे एक हाती १३ आमदार निवडूण देणे असो. अथवा ‘माझं’गावातून उतरवलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना येवल्यातून निवडून देणे. नाशिकच्या भूमीत ज्या राजकीय व्यक्तींनी सत्तेचे दान मागितले त्यांना भरभरुन मिळाले. भाजपच्या महाजनादेश यात्रेमुळे पुन्हा एकदा हा मुद्याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.

सन १९९५ अगोदर राज्यात काँग्रेसची सत्ता होती. यावेळी बाळासाहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढत विरोधकांवर ठाकरे शैलीत तोफा डागल्या होत्या. नाशिकमध्ये पक्षाचा जंगी मेळावा घेत आता तरी सत्तेचा दुष्काळ संपू दे असे मागणे महाराष्ट्रांच्या जनतेकडे मागितले होते. त्यावेळी त्यांनी ‘दार उघड बये… दार उघड’ अशी साद घातली आणि विधानसभेच्या सत्तेची कवाडे युतीसाठी खुली झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भाजपचा उपमुख्यमंत्री झाला होता. या काळात भाजपने दाखवलेले ‘नखरे’ बघता बाळासाहेबांनी त्यांचे नामकरण ‘कमळी’असे केले होते.

बाळासाहेबांच्या निधनानंतर ही कमळाबाई तिच्या नाना तर्‍हांवर सेनेच्या वाघोबाला नाचवत आहे. या कमळाबाईच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप झाला. दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या भूमीतून दार उघड बये … दार उघड अशी साद घालत भाजपला महाजनादेश द्या, असा आशीर्वाद जनतेकडे मागितला. मागील पाच वर्षांपासून सीएम जरी भाजपचा असला तरी बहुमत नसल्याने वाघोबा देखील ‘कमळी’वर गुरगुर करायचा. ते बघता कमळाबाईने दार उघड बये …दार उघड अशी साद घालत युती झाली अथवा नाही झाली तरी ‘स्वबळा’सत्ता येऊ दे, असे साकडे घातल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!