बिगुल वाजताच सोशल मीडियात इच्छुकांचा ‘कॅरेक्टर बॉम्ब’
Share

नाशिक । प्रतिनिधी
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील निवडणूकांची घोषणा केली. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेच्या प्रतिक्षेत असलेल्या अतिउत्साही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह बल्क मॅसेज, सोशल मीडियाच्या पोस्ट्स पसरवत पुन्हा एकदा सोशल शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यामध्ये कॅरेक्टर सर्टीफिकेटचा दाखला देत उमेदवाराची वर्तवणूक दाखवत सहानूभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मतदानाचा प्रचार करताना अनेक उमेदवार तसेच कार्यकर्ते नको त्या स्तरावर जाऊन प्रचार करतात हे काही नवीन नाही. मात्र, पहिल्या दिवसापासूनच सोशल प्रचार थेट कॅरेक्टर सर्टिफीकेटपासून सुरु केल्यामूळे प्रचाराचा नवा फंडा यानिमित्ताने समोर आलेला आहे. आमचा उमेदवार अध्यात्मिक आहे…आमच्या उमेदवाराला अमुक अमुक पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणीच कार्यकर्त्यांकडून थेट सोशल मीडियात करण्यात आली आहे.
पक्षाच्या नेत्यांकडून कुणी तरुणांना संधी देणार असल्याचे म्हटले तर कुणी निष्ठावानांना विसरणार नसल्याचे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पक्षांतर केलेली, मेगा भरतीत नंबर लावून पक्षात दाखल झालेल्या मंडळीचा अजून कुठेच विचार झाल्याचे प्रकाशझोतात आलेले नाही. मात्र, त्यांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या सुरु असून इच्छूकांची भाऊगर्दी सध्या सोशल मीडियाच्या आखाड्यात झालेली दिसून येत आहे.
आज निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून दिवसांपुर्वीच पाच मतदारसंघात उमेदवारी जाहिर करण्यात आल्या. ठिकठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनेक पक्षांनी उमेदवारी कुणाला मिळणार, कुठल्या निकषांनी मिळणार यावर कुठेही भाष्य केलेले नाही. यामूळे मिळेल त्या सेवेच्या माध्यमातून अॅक्टीव्ह राहण्यालाच पसंतीक्रम देत सोशल मीडियात सध्या प्रचाराचा नारळ इच्छुकांनी फोडल आहे.