Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक प्रचार साहित्य दाखल, राजकीय पक्षाचे झेंडे, पताका, स्टिकर्सचा समावेश

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून आता जाहीर प्रचार, तसेच सभा आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू होणार आहे. याकरिता लागणारे प्रचार साहित्य शहरातील दुकानांत दिसू लागले आहे. विविध राजकीय पक्षांंनी देखील प्रचाराचे साहित्य खरेदी केले असून येत्या मंगळवारपासून प्रत्यक्ष (दि. ८) निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

विविध पक्षांचे स्टिकर, ध्वज, गळ्यातील पट्ट्या आदी प्रचार साहित्य शहरातील दुकानांत दाखल झाले आहे. सोशल मीडियातूनही जोरदार प्रचार होत आहे. तरी, प्रचार साहित्याला मागणी कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राज्यात विविध भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पक्षाचे झेंडे, पताका, गळ्यातील पट्टे, टोप्या यांना आजही मागणी आहे.

एखादी सभा असल्यास याला अधिक मागणी असते. डोक्यात टोपी आणि गळ्यात पट्टी लावून कार्यकर्ते आता मिरवू लागले आहेत. हे प्रचार साहित्य वर्षभर केव्हा तरी लागत असले तरी पाच वर्षांत या एक महिन्यात मात्र याला प्रचंड मागणी असते. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा चीनमधून प्रचार साहित्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजप जरी मेकिंग इंडियाचा नारा देत असले, तरी राजकीय पक्षाच्या प्रचारात चीनच्या प्रचार साहित्याने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

प्रचार साहित्यात राजकीय पक्षाचे बॅनर, बिल्ले, झेंडे, टोप्या, दुपट्टे, अंगठी, टी-शर्ट, हातगंडे आणि फुगे, राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक मोठ्या प्रमाणात विक्री होतात. मात्र आता निवडणुकीत डिजिटल प्रचार साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हे डिजिटल साहित्य चीनमध्ये तयार केले जाते.

ज्यामध्ये लाईट लावलेले राजकीय पक्षाच्या चिन्हाचे बिल्ले, हेअर बॅड, ईअर रिंग, एप्रोन, पर्स, मोबाईल कव्हर, टोपी यांचा समावेश आहे. नुकताच यांचा वापर लोकसभा निवडणुकीत झाला होता. मात्र ती फक्त ट्रायबेस होती. मात्र लोकसभा निवडणुकीत या चायनीज प्रचार साहित्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात चायनीज प्रचार साहित्य बाजारात आले आहे. त्यालाही प्रतिसाद मिळत आहे.

चिन्ह मिळण्याची प्रतिक्षा  
सध्या मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रचार साहित्याची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यांची निर्मिती केली जात आहे. मात्र अपक्ष उमेदवाराचे जोपर्यंत चिन्ह वाटप केले जात नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून प्रचार साहित्याची मागणी होत नाही. तसेच आता नेमेकी लढत कुणाशी होणार हे चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचार साहित्य विक्रेत्यांना ऑर्डर दिल्या जात आहे. या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी विक्रेत्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!