Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक परिमंडळात १ हजार ८४० सौर कृषीपंप कार्यान्वित

Share
नाशिक परिमंडळात १ हजार ८४० सौर कृषीपंप कार्यान्वित; 1 thousand 840 Solar agricultural pumps are operational in Nashik

एल.ई.डी. बल्ब व बॅटरी चार्जिंगचीही सोय

नाशिकरोड । प्रतिनिधी

ज्या शेतकर्‍यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकर्‍यांना अटल सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत प्राधान्य दिल्याने महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात १ हजार ८४० सौर कृषीपंप कार्यान्वित झाले असल्याने शेतकर्‍यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरायची होती.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी नाशिक परिमंडळाअंतर्गत असणार्‍या ज्या शेतकर्‍यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे. त्यामध्ये नाशिक शहर मंडळातील १ हजार ४९, मालेगाव मंडळातील १९५ तर अहमदनगर मंडळातील ५९६ शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकर्‍यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ४०९ आणि दुसर्‍या टप्यातील ५०३ शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक परिमंडळातील एकूण १८४० शेतकर्‍यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.

सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्नच निर्माण होत नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे. कमीत कमी देखभालीची गरज आहे. विजेची तार तूटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही. सौरकृषिपंपाचे आयुर्मान सरासरी २५ वर्षे आहे.

सौर कृषिपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे तर सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षाचा आहे. या कालावधीत सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत संबंधित एजन्सी विनामूल्य दुरुस्ती करणार आहे. सौर कृषीपंपाचा ५ वर्षासाठी एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात आलेला आहे. त्यामुळे सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास लाभार्थी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी पात्र ठरेल. विशेष म्हणजे सौर कृषीपंपासोबत दोन डी.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंग पॉईंटची सुविधाही देण्यात आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!