जिल्ह्यात दहावीचे ९८ हजार परीक्षार्थी

जिल्ह्यात दहावीचे ९८ हजार परीक्षार्थी

विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी प्रविष्ठ

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत असून मंगळवार (दि. ३) रोजी पहिला पेपर घेतला जाणार आहे. जिल्ह्यात २०२ केंद्रांवर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे, तर नाशिक विभागात ४४५ केंद्रांवर २ लाख १६ हजार ४४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

करिअरचा टर्निंग पॉइंट म्हणून दहावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असते. ही परीक्षा अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विद्यार्थीदेखील परीक्षेसाठी सज्ज झाले असून शिक्षण मंडळाची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

मागील वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली होती. या पार्श्वभूमीवर गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. मंगळवारी सकाळ सत्रात ११ ते २ यावेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी, तर दुसर्‍या सत्रात दुपारी ३ ते ६ यावेळेत जर्मन आणि फ्रेंच विषयाचा पेपर होईल.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानुसार परीक्षा द्यावी, इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिक विभागीय मंडळाने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विभागासाठी ५९ परीक्षकांचीही नेमणूक केली आहे. त्यात नाशिकसाठी २६, धुळे-८, नंदूरबार-७, जळगाव १८ असे परीक्षक नेमण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय विद्यार्थी, केंद्र संख्या

जिल्हा                          केंद्रसंख्या             प्रविष्ठ विद्यार्थी
नाशिक                             २०२                     ९७,९३४
धुळे                                    ६३                     ३१,८३७
नंदुरबार                              ४६                     २२,६०३
जळगाव                            १३४                     ६४,०७०
एकूण                               ४४५                   २,१६,४४४  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com