तीळगुळासोबत हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल

तीळगुळासोबत हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल

नाशिक । प्रतिनिधी

मकरसंक्रांतीच्या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. ‘तीळगूळ घ्या अन् गोड बोला’ असे म्हणत अबालवृद्ध या सणाला तीळगुळाची लयलूट करतात. आरोग्यवर्धक तीळगुळासोबतच या सणात हलव्याच्या दागिन्यांनादेखील महत्त्व असून लहान बाळापासून ते महिलांसाठीचे हलव्याचे दागिने बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. कलात्मक पद्धतीने बनवलेले हे दागिने ८० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत.

संक्रांतीचा सण नवपरिणीत वधू आणि नवजात बालकांना हलव्याचे दागिने परिधान करून साजरा करण्याची परंपरा आहे. हौसेखातर का होईना परंपरा जपली जात असल्याने हलव्याच्या दागिन्यांना बाजारात मागणी असते. खसखस, तीळ, शेंगदाणे, गूळ, साखर, शेंगदाणे, मुरमुरे, तांदूळ यापासून हे दागिने बनवले जातात. कागदाचादेखील काहीअंशी वापर केला जातो.

दिवाळीचा सण आटोपल्यावर संक्रांतीच्या सणासाठी दागिने बनवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते असे या व्यवसायातील वर्षा शौचे यांनी सांगितले. साधारणपणे रथसप्तमीपर्यंत या दागिन्यांना मागणी असते. डोहाळे जेवणासाठीही हलव्याचे दागिने वापरले जातात. केवळ लहान बालके, नवपरिणीत सूनच नाही तरी जावई आणि हौशी सासवांसाठीदेखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात, असे त्या म्हणाल्या.

बालकांसाठीही दागिने
लहान बालकांसाठीच्या दागिन्यांत पैंजण, डोक्याचा पट्टा, कमरपट्टा, बाजूबंद असे दागिने आहेत. तर महिलांसाठी शाहीहार, नक्षत्रहार, बोरमाळ, बकूळ माळ, चंद्रहार, लफ्फा, वाकी, बिंदी, छल्ला या प्रकारातील दागिन्यांची मालिका आहे. जावयांसाठीच्या दागिन्यांमध्ये दोन ते तीन पदरी हार, नारळ, फुलाचा गुच्छ, ब्रेसलेट, बाळी यासह हलव्याच्या दागिन्यांपासून सजवलेली डायरी, पेन, घड्याळ, मोबाईल आदी वस्तूंचाही सेट उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com