Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेअर हाऊसची जागा भाडेपट्ट्यावर देण्यास विरोध

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेअर हाऊसची जागा भाडेपट्ट्यावर देण्यास विरोध

पंचवटी । वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सेंट्रल वेअर हाऊसची २५ हजार ७६८ चौरस फुट क्षेत्र असलेली जागा २९ वर्षासाठी भाडेपट्टा करारावर देण्यात येणार आहे. त्यासाठी बाजार समितीने निविदा मागविल्या आहेत. ही जागा नाशिक बाजार समितीची एकमेव स्वतःच्या मालकीची जागा असून ती मोक्याच्या ठिकाणी आहे. ती दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टे कराराने दिल्यास तिचा मालकी हक्क संपुष्टात येऊन बाजार समितीचे नुकसान होणार असल्याने ही जागा भाडेपट्ट्यावर देण्यास माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्टे करार करणे म्हणजे एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या जागेची विक्री करणेच आहे. त्यामुळे बाजार समितीला भविष्यात त्या जागेवर कुठल्याच प्रकारचा विकास आराखडा तयार करता येणार नाही. ही जागा अकरा महिन्याच्या कराराने भाडेतत्वावर दिल्यास तिचा संपूर्ण ताबा हा बाजार समितीकडे असेल, त्या जागेवर बाजार समितीला भविष्यात पाहिजे तसे बांधकाम करून कोल्डस्टोअरेज, शॉपिंग मॉल, विक्री हॉल आदी भाडेतत्त्वावर देता येईल. त्यातून बाजार समितीला आर्थिक नफा मिळेल.

ही जागा गोडावून म्हणून केंद्र सरकारच्या योजनेनुसार बांधण्यात आलेले आहे. त्याचा गोडावून म्हणूनच उपयोग अपेक्षित आहे. या जागेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. संचालकांनी कोणत्या ठरावाद्वारे हा निर्णय घेतला त्याचा उल्लेख नाही. २९ वर्षाचा कालावधीचा निकष कशाच्या आधारे लावला ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे सेंट्रल वेअर हाऊसची जागा व त्या भोवतालचे आवार दीर्घ मुदतीच्या भाडे कराराने देणे ही बाब संस्थेच्या हिताच्या दृष्टीने योग्य व कायदेशीर नाही. ही कार्यवाही तात्काळ रद्द करण्याची आदेश देण्यात यावे अशी मागणीचे अर्ज विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पणन संचालक, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना चुंभळे यांनी दिले आहेत.

यापूर्वी देखील तीस वर्ष भाडेपट्टा कराराने वेअर हाऊस देण्यात आले होते, मासिक भाडे ७५ हजार व अनामत रक्कम २ लाख होते. हा करार संपल्यानंतर माजी सभापती चुंभळे यांनी मुदत वाढ दिली नाही. गेल्या ७ महिन्यापासून ते बाजार समितीकडे असल्याने समितीचे ५ लाख २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. आता ९० हजार २०० रुपये भाडे प्राप्त होणार आहे. अनामत रक्कम ७ लाख रुपये जमा होणार आहे. त्यामुळे वार्षिक १ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा बाजार समितीचा फायदा होणार आहे.
संपतराव सकाळे ,सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या