Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विविध शैक्षणिक विभागांतील प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : विविध शैक्षणिक विभागांतील प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा

यूजी आणि पीजीसाठी लवकरच वेळापत्रक

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील पदवी (यूजी) आणि पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमांसाठी यंदाही ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात चालणार्‍या विविध अभ्यासक्रमांसाठी गेल्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांना उत्तम प्रतिसाद मिळाला; तसेच ठिकठिकाणी परीक्षा केंद्रे असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना सहज परीक्षा देता आल्या. या पार्श्वभूमीवर यंदाही विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी पुण्यात येण्याची आवश्यकता नव्हती, तर ते आपल्या गावाजवळ असणार्‍या केंद्रावर परीक्षा देऊ शकले. त्यामुळे या परीक्षांना चांगला प्रतिसाद लाभला. या ९५ अभ्यासक्रमांसाठी सुमारे २६ हजार ५०० विद्यार्थी बसले होते. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गुणवत्तेतही वाढ झाली.

या परीक्षेच्या अशा जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा व सविस्तर कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

मात्र, या व्यतिरिक्त डिप्लोमा व सर्टिफिकेट अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा या संबंधित अभ्यासक्रम सुरू असणार्‍या विभागांकडून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील. या अभ्यासक्रमांची संख्या ५५ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या