Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘वाचनध्यास’साठी विशेष अर्थसहाय्य; राज्य मराठी विकास संस्थेची घोषणा

Share

नाशिक । प्रतिनिधी

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच वाचन प्रेरणादिन! यानिमित्त ‘वाचनध्यास’ हा उपक्रम तसेच वाचन व अभिवाचन कट्ट्यांचे आयोजन करणारी ग्रंथालये व संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या संस्थांना प्रत्येकी पाच हजार रुपये सरकारमार्फत दिले जातील, अशी घोषणा राज्य मराठी विकास संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

वाचनाची आवड वाढावी, राज्यात ठिकठिकाणी वाचन कट्ट्यांचे आयोजन केले जावे, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 1५ ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘वाचन प्रेरणादिन’ साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्याच्या कानाकोपर्‍यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हेच औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘वाचनध्यास’ या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

याअंतर्गत संस्थेने अथवा ग्रंथालयाने सलग आठ तास पुस्तक वाचनाचा कार्यक्रम राबवणे अपेक्षित आहे. अशा संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेकडून पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल शिवाय विविध संस्था आणि ग्रंथालयांनी वाचन कट्ट्यांचे आयोजन करावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

स्थानिक वाचनालयांनी त्यांच्या वाचनालयाच्या परिसराबाहेर वाचन कट्ट्याचे आयोजन करावे. अधिकाधिक सामान्य वर्गाला या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. स्थानिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयातील पुस्तकांची वाचन केंद्रे आपापल्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उभारावीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाचनाचा लाभ घेता येईल.

या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्यासाठी निश्‍चितच हातभार लागू शकेल. या उपक्रमाबाबतचे सर्व नियम व अटी संस्थेच्या rmvs.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ‘गुगल’ अर्जात नमूद करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होणार्‍या संस्थांनी हा अर्ज भरणे बंधनकारक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!