संकेतस्थळावर माहिती न टाकल्याने जिल्हा परिषदेच्या 18 खातेप्रमुखांना नोटीसा

0

नाशिक, दि.28, प्रतिनिधी

सरकारने डिजिटल इंडियाचा ध्यास घेतला आहे. परंतु त्याबाबत शासकीय अधिकारी अद्याप अनभिज्ञ आहेत की काय अशी स्थिती नाशिक जिल्हा परिषदेत आहे.

नेटवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागात माहिती अपडेट न केल्याने जिल्हा परिषदेच्या 18 खातेप्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गात धावपळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेशी निगडीत सर्वच कामांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. याशिवाय बांधकामविषयक निविदा, खरेदी विक्रीबाबतच्या निविदा, ठेकेदारांसाठी नविदा, नवीन उपक्रम, कार्यशाळा, खात्याशी निगडीत सर्वच बाबींचे अपडेट, सुरू असलेले उपक्रम, संख्यात्मक माहिती प्रत्येक विभागाने देणे बंधनकारक आहे.

परंतु असे असतांनाही कोणत्याही विभागाकडून संकेतस्थळावर अपडेट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची तसेच ठेकेदारांचीही तारांबळ उडते. वेबवर माहितीच मिळत नसल्याने कामासाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात.

याशिवाय निविदाप्रक्रिया तसेच अन्य कामात जाणीवपूर्वक घोळही निर्माण होतो. शासनाकडून याबाबत प्रत्येक विभागाला निर्देश देण्यात आलेले असले तरी अधिकारी वर्गाकडून या सूचना गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळेच सर्व विभागांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 18 विभागातील अधिकारयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांना या अधिकारयांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. याशिवाय आपल्याकडील माहिती लवकरात लवकर अपडेट करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*