जि. प.च्या ५ कर्मचार्‍यांवर सक्त कारवाई

येवला आढावा बैठकीत सीईओ डॉ. गितेंचा रूद्रावतार

0
नाशिक । प्रतिनिधी- अनाधिकृतपणे रजा, अंगणवाडी बांधकामामध्ये अनियमितता, बिले सादर न करणे आणि न सांगता गैरहजर राहणे अशा गंभीर बाबींची दखल घेत आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. पाच कर्मचार्‍यांवर थेट निलंबन, फौजदारी आणि सेवामुक्तीची कारवाई केली. आज सीईओंचा हा रूद्रावतार कर्मचार्‍यांना पाहण्यास मिळाला. विविध कार्यालयीन तसेच विकासकांबाबत डॉ. गिते यांच्या उपस्थितीत येवला तालुक्याची आढावा बैठक महात्मा फुले नाट्यगृहामध्ये पार पडली.

येवला तालुक्याच्या आढावा बैठकीत डॉ. गिते यांनी कंत्राटी ग्रामसेविका अर्चना आव्हाड 2012 पासून अनाधिकृतपणे गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना सेवामुक्त केले तर कुसुमाडी दगडीचा माळ, नायगव्हान, धामोडे व नगरसूल येथील अंगणवाडी बांधकामात अनिमियतता करणार्‍या बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता व्ही. बी. वाईकर (सेवानिवृत्त), के. इ. उशीर व पी. एम. सोनवणे या तिघांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच सोमठाण देश येथील सिंचन विहीर पूर्ण असून व मोजमाप पुस्तिका भरूनही अद्याप बिल सादर न करणार्‍या ग्रामसेवकाबाबत ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन व संबधित लाभार्थाकडून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केल्या. अनधिकृत गैरहजर असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता थवील यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश गट विकास अधिकार्‍यांना दिल्या.

तर ऐन आढवा बैठकीत भ्रमणध्वनीवर बोलण्यात दंग असलेल्या नगरसूल येथील आरोग्यसेविकेस सभागृहाच्या बाहेर जाण्याची सूचना करत खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही यावेळी डॉ. गिते यांनी दिले आहे. या आढावा बैठकीत डॉ. गिते यांनी आढाव्यासह कुपोषणमुक्त जिल्ह्याचा नारा बैठकीत देत संपूर्ण यंत्रणेची उजळणी घेत मार्गदर्शन केले. याबरोबर सर्व घरकुलांची आधारशी जोडणी, सिंचन विहिर, विहीर पुनर्भरण, पाणी पुरवठा योजना, ग्राप मधील जन सुविधेचे कामे, घरकुल इ योजनाची अपूर्ण बांधकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी डॉ गिते यांनी सर्व संबंधिताना दिले. यावेळी प्रत्येक विभागाप्रमुखांनी आपापल्या विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कुपोषण निर्मूलनाचा नारा
डॉ. गिते यांनी कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्व दिले आहे. यावेळी कुपोषण निर्मुलन झालेच पाहिजे, हे घोषवाक्य डॉ गिते यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांकडून वदवून घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडूनही सदरचे घोषवाक्य सर्वांसमोर म्हणून घेण्यात आले.

जिल्हा शेवगामय करा : डॉ. गिते

शेवग्याचे झाड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून कुपोषण निर्मुलनासाठी हे झाड वरदान आहे. शेवग्याच्या झाडाचे फुल, शेंगा, पाला यापासून आवश्यक पोषकतत्व प्राप्त होत असल्याने दैनंदिन आहारात याचा वापर कारणे गरजेचे आहे. प्रत्येक अंगणवाडी, आरोग्यकेंद्र व कुपोषित बालकांच्या घर-परिसरात शेवग्याची झाडे लावण्याचे आवाहन करून डॉ. गिते यांनी शेवग्याच्या झाडांच्या बियांचे वाटप केले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेवगा लाऊन जिल्हा शेवगामय करण्याचे आवाहन डॉ. गिते यांनी केले.

गितेंची गुपचूप एन्ट्री…
तालुका आढावा बैठक सुरु असताना डॉ. गिते हे मागील दाराने गुपचूप येऊन कर्मचार्‍यांमध्ये बसले. यावेळी आहार व आरोग्य संहितेचा आढावा घेण्यात येत होता. डॉ. गिते आल्याची कुणालाच गंधवार्ता नव्हती. अर्धा ते पाऊन तास डॉ. गिते मागील खुर्चीवर बसून सर्व ऐकत होते. यावेळी नगरसूल येथील आरोग्यसेविका मोबाईलवर व्यस्त असल्याचे डॉ. गिते यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारवाई केली. त्यांच्या गुपचूप एन्ट्रीने अधिकार्‍यांसह कर्मचारी अवाक् झाल्याचे चित्र दिसले.

LEAVE A REPLY

*