जीवन समृद्ध करण्यासाठी क्रीडा उत्तम साधन

पोलीस आयुक्त सिंगल यांचे प्रतिपादन

0

नाशिक । दि. 20 प्रतिनिधी
खेळामुळेच जीवनात मोठी उंची गाठता येते. जो विद्यार्थी मैदानावर खेळतो त्याचे शरीर निरोगी राहते व निरोगी मनच देशाला पुढे नेते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच जीवनाचे ध्येय निश्चित करणे गरजेचे असून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी क्रीडा क्षेत्र उत्तम साधन आहे.

खेळामुळे विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात मैदानी खेळ लोप पावत असल्याची खंत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. पी. नाठे, कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे, वित्त अधिकारी मगन पाटील, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील उपस्थित होते.

पोलीस आयक्त डॉ. सिंगल म्हणाले, मैदानी खेळामुळे विद्यार्थांच्या शारीरिक क्षमता विकसित होतात. निरनिराळ्या खेळांमुळे व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल घडत असल्याने यशाच्या उंच शिखरावर सहजतेने पोहोचता येईल. तसेच मुक्त शिक्षण पद्धतीमुळे क्रीडा क्षेत्रात कामगिरी करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना असंख्य संधी असल्याचे सांगितले. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी भरपूर वेळ मिळत असल्याने या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करता येते असे सांगून खेळ खिलाडूवृत्तीने खेळल्यास यश सहजपणे मिळवता येते. पोलीस हे समाजाचे मित्र असून ते मित्रच राहतील, असेही डॉ. सिंगल यांनी सांगितले.

यावेळी तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. पी. नाठे म्हणाले, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या या विद्यापीठाचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगिरी करत आहेत. खेळाडूंना खेळाबरोबरच उच्चशिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी विद्यापीठाच्या औरंगाबाद, अमरावती, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, नागपूर, पुणे आणि नाशिक या विभागीय केंद्रांच्या संघांनी मैदानावर संचलन करून अतिथींना मानवंदना दिली.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. विद्यापीठाच्या नितीन पालवे या राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने खेळ खेळण्याची शपथ दिली. या क्रीडा महोत्सवात धावणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, गोळाफेक यासह 17 विविध क्रीडा स्पर्धा होणार असून यासाठी महाराष्ट्रातून 450 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

प्रास्ताविक कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले. शिल्पा पाटील, ज्योती पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. बाजीराव पेखळे यांनी केले. विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*