आवर्तन लांबल्याने आरमखोर्‍यात पाणीटंचाईचे संकट

केळझरमधून त्वरित पाणी सोडा; डांगसौंदाण्यासह तीस गावांच्या ग्रामस्थांची मागणी

0
डांगसौंदाणे । निलेश गौतम-केळझर (गोपाळसागर)- धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी तिसरे आवर्तन सोडण्यास पाटबंधारे विभागातर्फे होत असलेल्या विलंबामुळे आरम नदीकाठावरील डांगसौंदाणेसह 25 ते 30 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तीव्र तापमानामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ महिला व अबालवृध्दांवर आली असून जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाने फक्त सनपाचा विचार न करता हे पाणीटंचाईचे संकट त्वरित दूर करावे, अशी मागणी संत्रस्त ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

धरण उशाशी-कोरड घशाशी, अशी अवस्था केळझरच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या आराई नदीकाठावरील ग्रामस्थांची झाली आहे. धरणात पाणी शिल्लक असून देखील पाण्यासाठी तब्बल 25 ते 30 गावातील महिला व अबालवृद्धांना हंडे घेवून भटकंतीची वेळ आली आहे. 572 द.ल.घ.फूट पाणीसाठ्याची क्षमता असलेले केळझर धरण बागलाण पश्चिम भागातील 25 ते 30 गावांसाठी जीवनदायी ठरले आहे. पाण्याचे पहिले व दुसरे आवर्तन रब्बी हंगामासाठी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये दिले जाते. तिसरे व शेवटचे 90 द.ल.घ.फूट पाण्याचे आवर्तन हे पिण्यासाठी शिल्लक ठेवण्यात येते. सटाणा नगरपालिकेच्या मागणीनुसार 5 मे च्या दरम्यान जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागातर्फे सोडण्यात येत असल्याने सटाण्यासह आरम काठावरील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता.

मात्र, गत तीन ते चार वर्षांपासून केळझरचे आवर्तन 5 ऐवजी 15 मेच्या दरम्यान सटाणा नगर परिषद आपल्या मागणीनुसार सोडून घेते. सटाणा शहराला केळझर व्यतिरिक्त पुनद धरणातून देखील पाण्याचे आवर्तन मिळत असल्याने शहरास पिण्याच्या पाण्याची भीषणत: पहिल्या टप्प्यात जाणवत नाही. मात्र, आरम नदीकाठावरील गावांना मात्र मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात पाण्यासाठी अक्षरश: संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

आरम नदीकाठावर असलेल्या डांगसौंदाणेसह मुंजवाड, मळगाव, चौंधाणे, निरपूर, खमताणे, कंधाणे, चौंधाणे, निकवेल, दहिंदुले, चाफ्याचेपाडे, बुधाटे, वड्याचे पाडे, करंजखेड, दगडी साकोडे, मोठे साकोडे, भावनगर, तताणी आदी सर्वच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी या आरम नदीकाठावर आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून 43 अंशावर पोहोचलेल्या तापमानामुळे भुगर्भ जलाची पातळी अत्यंत खालावल्याने या विहिरीनी तळ गाठला आहे. त्यामुळे आरम काठावरील सर्वच गावे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.

पाणीपुरवठा योजना विहिरींनी तळ गाठल्यामुळे जवळपास ठप्प झाल्या आहेत. शेतशिवारातील विहिरींना देखील पुरेसे पाणी नाही. त्यामुळे अनेक गावात पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे तर गोरगरीब महिला, अबालवृद्ध हंडे घेवून पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तीव्र तापमानामुळे उन्हाळी झळांमुळे अनेकांना त्रास होत असल्याने रूग्णांची संख्या दिवसेगणिक वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता हरणबारीसह जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दिले जात असताना केळझरचे आवर्तन सोडण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न संत्रस्त ग्रामस्थांना पडला आहे. सनपा मागणीचा विचार न करता आरम काठावरील 25 ते 30 गावांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेत केळझरचे आवर्तन त्वरित सोडण्यात येवून त्रस्त जनतेस दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच व पदाधिकार्‍यांतर्फे केली जात आहे.

LEAVE A REPLY

*