एकतर्फी प्रेमातून चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याची युवतीला धमकी

0

नाशिक । आपल्या सोबत लग्न न केल्यास तोंडावर अ‍ॅसिड ओतून चेहरा विद्रूप करीन, अशी धमकी एकतर्फी प्रेमातून एका युवकाने 25 वर्षीय तरुणीला दिल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्स पटांगणात घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र भास्कर बस्ते (25, रा. खेडगाव, शिंदवड, पिंपळगाव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडित तरुणी 6 फेब्रुवारी 2018 रोजी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्यासाठी नाशिक-पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्सच्या बाजूकडील रस्त्याने जात होती.

याच वेळी संशयित रवींद्र भास्कर बस्ते हा तेथे आला. त्याने  एकतर्फी प्रेमातून रस्त्याने जाणार्‍या पीडितेला आडवून  तिचा विनयभंग केला. तसेच तु माझ्याशी लग्न न केल्यास मी तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड ओतून तुझा चेहरा विद्रूप करीन, अशी धमकी दिली.

भितीच्या सावटाखाली असणार्‍या सदर युवतीने अखेर काल उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. या प्रकरणी पोलीसांनी तातडीने  संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*