उस लावतांना चुन्याची निवळीचा वापर

0

शेतकरी बांधव सध्यस्थितीत उसाचे बेणे चुन्याच्या निवळी मध्ये बुडवून लावत आहेत व त्यामुळे उस निरोगी आणि वाढ सुद्धा झपाट्याने होत आहे असे निदर्शणास आल्याचे शेतकरी सांगत आहेत….

फार पूर्वी पासून पिकांवरील रोगाच्या नियंत्रणासाठी व इतर अन्नद्रव्ये पिकांना उपलबद्ध करुन देण्यासाठी चुन्याची निवळीचा वापर होत आलेला आहे. सन १८८२ मध्ये प्राध्यापक पि. ए. मिलार्डेट यांनी द्राक्षावरील डाउनी मिल्ड्यू (केवडा/ दवन्या) रोगाच्या नियंत्रणासाठी फ्रांस मधील बोर्डो विद्यापीठामध्ये (University of Bordeaux) मोरचुद आणि चुना यांचे मिश्रण करुन एक रामबाण मिश्रण बनविले जे आपण बोर्डो मिश्रण (Bordeaux Mixture) म्हणून अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य व इतर रोगांवर वापरतो.

चुन्याची निवळी वापरल्यामुळे पिकाची नत्र, स्फुरद व कॅल्शियम ग्रहण क्रिया वाढते जे पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे जमिनीचा सामू देखिल नियंत्रित होतो.

म्हणून उसाचे बेणे लावतांना चुन्यासोबत मोरचुद घेऊन बोर्डो मिश्रणामध्ये बेणे बुडवून लागवण केल्यास अधिकच फायदा होईल.

बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत – एक टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करावयाचे असल्यास त्याकरीता एक किलो चांगला कळीचा चुना, एक किलो मोरचूद (निळे स्फटिक खडे) आणि १०० लिटर पाणी घ्यावे.

चुन्याची निवळी आणि मोरचुदाचे द्रावण प्रत्येकी ५० लिटर पाण्यात वेगवेगळ्या धातुविरहित भांड्यात बनवावे. प्रथम १किलो कळीचा चुना घेऊन ५ लिटर पण्यात भिजत टाकावा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करावी त्यात १० लिटर पाणी टाकावे, नंतर चुना द्रावण गाळून घ्यावे नंतर त्यात राहिलेले ३५ लिटर पाणी ओतावे.

१ किलो मोरचुद कापडी पिशवीत घेऊन ती पिशवी २० लिटर पाण्यात लोंबकळत प्लॅस्टिक किंवा मातीच्या भांड्यात ठेवावी. मोरचुद पूर्ण विरघळल्यानंतर त्यात उरलेले ३० लिटर पाणी टाकावे. नंतर दोन्ही द्रावणे एकत्र मिसळण्यासाठी लाकडी किंवा प्लॅस्टिक ड्रम किंवा सिमेंटची टाकी इत्यादी भांड्याचा वापर करावा. प्रथम चुन्याची निवळी गाळून एका स्वतंत्र भांड्यात ठेवावी. नंतर मोरचूद द्रावण वस्त्रगाळ करून ते हळूहळू चुन्याच्या निवळीच्या द्रावणात ओतावे. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळण्यासाठी स्वतंत्र तिसऱ्या लाकडी भांड्याचा उपयोग करावा. दोन्ही द्रावणे एकत्र मिसळताना द्रावण सारखे ढवळत राहावे. तयार झालेल्या बोर्डो मिश्रणाचा सामू उदासीन (7.5) असणे गरजेचे आहे.

      निरानिराळ्या तिव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी लागणारे पाणी, चुना आणि मोरचुद यांचे प्रमाण –
अ.क्र. द्रावणाची तिव्रता (टक्के) मोरचुद (ग्रॅम) कळीचा चुना (ग्रॅम) पाणी (लिटर)
१. १.० १००० १००० १००
२. ०.८ ८०० ८०० १००
३. ०.६ ६०० ६०० १०००
४. ०.४ ४०० ४०० १०००
५. ०.२ २०० २०० १०००

 

बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी – 

  • कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित असावा.
  • मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
  • दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत.
  • मिश्रण बनविण्यासाठी चांगले पाणी वापरावे. क्षारयुक्त पाणी वापरू नये.
  • विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये.
  • मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा.

त्याचप्रमाणे अ‍ॅसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू हे फुले द्रवरुप जीवाणू संवर्धन अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिप-या ३० मिनिटे बुडवून लागवन केल्यास नत्राची ५०% तर स्फुरदाची २५% बचत होते व उत्पादनात १० ते २०% पर्यंत वाढ होते.

डॉ. राजेश राठोड, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र (म.फु.कृ.वि.),मोहोळ.

 

LEAVE A REPLY

*