सिन्नर आमदार चषकावर येवल्याची मोहोर

0

सिन्नर, वार्ताहर, ता. २९ :

येथे पार पडलेल्या 61 व्या आमदार चषक जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धेत झालेल्या अंतिम लढतीत येवल्याच्या मल्लांनी विजयाची मोहोर उमटवली.

मातीवरील कुस्तीत राहुल पवार तर मॅट वरील कुस्तीत रोहन लोणारी यांनी आमदार चषकाचे मानकरी होतानाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.

आडव्या फाट्यावर 4 दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवल्यानंतर आज दि.29 हजारो सिन्नरकरांनी कुस्त्यांच्या दंगलीचा आनंद लुटला. वेगवेगळ्या वजन गटातून महिला व पुरुष स्पर्धकांनी आपले कसब दाखवले.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, नगराध्यक्ष किरण डगळे, येवल्याचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, स्पर्धेचे संयोजक उदय सांगळे,  सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावणारे विजय चौधरी, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरीसाठीच्या अंतिम निवड सामन्याची सुरुवात झाली.

मातीवरील कुस्ती प्रकारात130 किलो वजन गटात राहुल पवारची लढत त्रंबकेश्वरच्या सतीश यादव सोबत झाली. तर मॅट वरील कुस्ती प्रकारात दिंडोरीचा गौरव गणोरे चा सामना रोहन लोणारी सोबत झाला. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात येवल्याचे आपले कुस्तीतील वर्चस्व दाखवून दिले.

स्पर्धेच्या पहिल्या सत्रात युवा व विद्यार्थी गटातून शेकडो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, रामदास दराडे यांच्यासह मान्यवरांनी स्पर्धेला हजेरी लावली.

महाराष्ट्र केसरी नाशिकचा व्हावा

सिन्नर मधील कुस्ती स्पर्धेच्या नेटक्या आयोजनाबद्दल महाराष्ट्र केसरी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक  विजय चौधरी यांनी उदय सांगळे यांचे आभार मानले. इथली तयारी पाहून पुन्हा मैदानात उतरण्याचा मोह होत असल्याचे ते म्हणाले. यंदाचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा झाला पाहिजे एवढी तयारी इथल्या मल्लांची नक्कीच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मालेगावला क्रीडा महोत्सव भरवणार

पुण्या- मुंबईच्या तोडीचे आयोजन सिन्नरला केल्याबद्दल ना. भुसे यांनी उदय सांगळे व संयोजकांचे आभार मानले. सिन्नरचा आदर्श घेऊन आपण मालेगावात पुढचा क्रीडामहोत्सव भरवणार असल्याची त्यांनी घोषणा केली. नाशिक ही गुंणवंतांची खान असून अध्यक्ष चषक व आमदार चषकाच्या माध्यमातून खेळाडूंना उभारी मिळेल असा आशावाद ना. भुसे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*