सावाना ग्रंथालय सप्ताहास शुक्रवारपासून प्रारंभ

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असणार्‍या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या ग्रंथालय सप्ताहास येत्या शुक्रवार (दि.8) पासून प्रारंभ होणार आहे. 14 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या सप्ताहात दररोज सायंकाळी 6.30 वा. संस्थेच्या मु.शं. औरंगाबादकर सभागृहात मान्यवर वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 8 डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सर्वसामन्यांचा आधारवड स्व. वसंतदादा पाटील असा व्याख्यानाचा विषय असून हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती या विषयवार मोहसिना मुकादम, डॉ. सुषमा पौडवाल, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे.

यावेळी एम.लिब – बी. लिब अभ्यासक्रमात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास कै. मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 10 डिसेंबर रोजी वास्तुशास्त्रतज्ञ डॉ. धुंडीराज पाठक, पुणे यांचे वास्तुदोष आणि घरगुती उपाय या विषयावर व्याख्यान होणार आहे. कै. सावित्रीबाई वावीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या व्याख्यानाच्या वेळी आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

11 डिसेंबर रोजी ज्येष्ठ प्रकाशक अरुण शेवते, सुदेश हिंगलाजपूरकर, मुंबई यांचे आपले दिवाळी अंक या विषयावर व्याख्यान होणार आहे. 12 डिसेंबर रोजी अमरावती येथील सेवाभावी कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांचे आयुष्यमान व्हा या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कै. अन्नपूर्णाबाई डोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानाच्या वेळी उत्कृष्ट वाचक व बालवाचक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 13 डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे 14 डिसेंबर रोजी इंदिरा पर्व या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ग्रंथ सचिव प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे व कार्यकारी मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

*