सटाणा-नामपूर कृउबा समितीची आज मतमोजणी

प्रशासन यंत्रणा सज्ज; दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार; निकालाची तालुक्यात उत्कंठा

0
सटाणा-नामपूर । प्रतिनिधी- सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर उद्या गुरुवारी येथील तहसील आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भांडारे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

मतदान झाल्यानंतर स्ट्राँगरूममध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या असून उद्या सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसंदर्भात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दहा गणांतील शेतकरी मतदारसंघासाठी 10 टेबल व हमाल-मापारी तसेच आडते-व्यापारी मतदारसंघासाठी 1 अशा 11 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलासाठी पर्यवेक्षक, सहायक, शिपाई असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बाजार समितीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले असल्याने प्रारंभी मतपत्रिकांची वर्गवारी केल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे.

मतमोजणी काळात उमेदवार व त्यांचा एक प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. एकेका गणाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतमोजणी प्रक्रियेत सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने, देवळा नायब तहसीलदार गिरीश वाखारे, चांदवड नायब तहसीलदार रुपेश सुराणा, सटाणा कृउबा सचिव डॉ. तांबे, कृउबा उपसचिव विजय पवार, प्रकाश ह्याळीज, चंद्रकांत अहिरे आदींसह कर्मचारी सहभागी होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पो.नि. हिरालाल पाटील यांनी दिली. मतपत्रिकांद्वारे मतदान करण्यात आले असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.

नामपूर । संपूर्ण मोसम खोर्‍याचे लक्ष लागून असलेल्या नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या गुरुवारी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

18 जागांसाठी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. रिंगणात असलेल्या 13 गणांतील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या सकाळी 9 वाजेपासून सर्वच गणांतील मतमोजणी सुरू होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मशीनऐवजी चिठ्ठी पद्धत असल्यामुळे निकाल लवकर न लागता दुपारी 1 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकालास कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मतमोजणी ठिकाणी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात निवडणूक झाल्यामुळे निकालाबद्दल समिती कार्यक्षेत्रात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

*