भात उत्पादकांचे व्यापाऱ्यांसोबत शासनाकडूनही शोषण; मिळतोय कमी भाव

0

त्र्यंबकेश्वर ( मोहन देवरे) ता. २५ : बाजारात तांदूळ कमीत कमी ३५ ते ५० रुपये प्रति किलो विक्री होत असताना, भात उत्पादक शेतकऱ्याला प्रत्यक्षात १६०० ते १६५० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे त्र्यंबकेश्वरसह नाशिक पश्चिम पट्टयात सुरू झालेली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी केंद्र सध्या ओस पडलेली दिसत आहेत.

दुसरीकडे आगाऊ पैसे देणे, उसनवार पैसे देणे अशा गोष्टींच्या आमिषातून व्यापारीही शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत फसवत असले, तरी दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

त्यामुळे भात खरेदीचा हा दर १६५० वरून २००० रुपये प्रति क्विंटल असा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने अंजनेरीच्या माजी सरपंच जिजाबाई लांडे यांनी केली आहे.

शासनाचे हमीभाव कमी असल्याने खासगी व्यापारीसुद्धा शेतकऱ्यांना पाडून भाव देतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकरी नाडला जातो. विशेष म्हणजे १६५० रुपये भावाने खरेदी केलेला इंद्रायणीसारखा भात बाजारात मात्र सध्या ५० ते ५५ रुपये म्हणजे जवळपास तिपटीहून जास्त दराने विक्री होताना दिसत आहे. उत्पादन खर्च आणि येणारा भाव बघता शेतकरी नाडला जात असल्याचे चित्र आहे.

सध्या शासनाचे हमी दर भातासाठी १६०० ते १६५०, वरईसाठी २६००, नागली १६००, खुरसणी : ५०००, सोयाबीन २४०० रुपये असे आहेत.

 

LEAVE A REPLY

*