Type to search

Featured आवर्जून वाचाच दिवाळी विशेष - रिपोर्ताज नाशिक

वास्तव महाराष्ट्रच्या सीमेवरील गावांचे…

Share

देशदूतने मध्यंतरी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून विविध सरकारी योजना आणि गावांच्या विकासाची स्थिती जाणून घेतली. आमच्या रिपोर्टरच्या डायरीचे ‘पेठ’ तालुक्यातील  ‘आडगाव ‘ परिसरातील स्थितीचे हे प्रकरण.

दु सर्या दिवशी प्रवासातील पुढच्या टप्प्यात पेठ तालुक्यात जाण्यासाठी निघालो. रस्ता डोंगराच्या कड्याने असल्याने मधेच अगदी वेडे-वाकडे वळण येत होती. काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी खाच खड्यांनी रस्ता भरला होता. मध्येच मोठी चढती तर मधेच भली मोठा उतार देखील येत होता.

 

मधूनच येणारी थंड वार्याची झुळुक मनाला सुखावत होती. उंचावर दिसणारी छोटीशी झोपडी मनात कुतूहल निर्माण करत होती, कोण तेथे एवढ्या उंचावर राहत असेल असे एकंदरीत विचार मनात येत होते. रस्त्यावर असलेली भयाण शांतता क्षणात समाधी अवस्थेत नेत होती. येथील झाडे, पक्षी, नदी वाहः निसर्ग न मागताच आपल्या किती तरी भरभरून देत असतो. परंतु मानवाने आपल्या सोयीनुसार हवा तसा वापर करून घेतला आहे. याची जाणीव सारखी होत होती.

पेठ तालुक्यातील आडगाव या छोटाश्या पाड्यावर मी आता आलो. गाव सुरु होताच विहिरीवरून पाणी नेत असताना महिला दृष्टीस पडल्या. पाण्याची तीव्र टंचाई येथे जाणवत होती. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरींनी तळ गाठला होता.
घरापर्यंत नळ कनेक्शन नसल्याने महिलांना दुरून पाणी आणण्याशिवाय पर्याय नव्हता. परिस्थिती जाणून घेताच लक्षात आले की, ग्रामस्थ फक्त पावसाळ्यात ४ महिने शेती करतात व इतर वेळी काम धंदा करण्यासाठी शहराकडे किंवा सधन भागातील शेतीच्या कामांसाठी कसमादे किंवा निफाड, दिंडोरी तालुक्यात समूहाने मोलमजुरीसाठी जातात.

 

येथील आदिवासी पाड्यांवर दिवसातून १२ तास वीजपुरवठा खंडित असतो. येथे ठराविक उंच जागी काही कंपन्यांचे नेटवर्क येत असल्याने येथील तरुणांना इंटरनेट व्यसनाचे प्रमाण शहरातील तरुणाई पेक्षा अत्यल्प आहे. मनोरंजनासाठी येथील तरुण क्रिकेट खेळण्यावर व जवळच्या जंगलात फिरण्यावर भर देतात. त्यांचा सोबत मीही फिरस्ती करण्यासाठी निघालो.

जवळच्या टेकडीवर गेलो असता भयाण वास्तव माझ्या दृष्टीस पडले. जागोजागी मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. अनेक जुनी वृक्ष सरपणासाठी तोडण्यात आली होती.
हे दृश्य मनाला वेदना देऊन गेले. सरकारच्या ‘उज्ज्वला’ योजने अंतर्गत येथील अनेक कुटुंबांना गॅस कनेक्शन आले आहेत. परंतु तरीही झाडांची कत्तल सर्रास सुरूच होती. वन विभागाच्या देखरेखी बद्दल विचारणा केली असता, एक मुलगा म्हणाला ‘अहो, वन अधिकारी कसा असतो हे मी आज पर्यंत पहिला नाही. आणि ते कधी इकडे फिरकत देखील नाहीत’ हे ऐकताच खंत वाटली.

या सर्व घटनांचा विचार करत असतानाच एक मुलगा सर-सर झाडावर चढत भरपूर आंबे पाडू लागला. मी अचंबित झालो ६०-७० फूट असलेल्या झाडावर हा गडी एवढ्या वायू वेगाने चढला कसा? हीच ह्या मुलांची खासियत आहे.

जन्मापासून निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या लोकांना कुठल्याच विशेष प्रशिक्षनाची गरज नसते. त्यांचा रक्तातच निसर्गासोबत समरस होण्याचे गुण असतात. नुकत्याच पिकलेल्या कैर्याना ग्रामीण भाषेत ‘शाक’ असे म्हणतात. साधारण मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात आंबे झाडावरच पिकतात. या रसाळ आणी मधुर शाखांवर मी मनसोक्त ताव मारली.

दरम्यान, आम्ही येईपर्यंत काकूने लज्जतदार ग्रामीण जेवणाची व्यवस्था केली होती. आदिवासी भागात प्रसिध्द असलेल्या नाचणीच्या भाकरी, भात, भाजी खाऊन मी तृप्त झालो. जेवणानंतर आम्ही महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असलेल्या ‘बिलकस’ गावी जाण्याचे ठरवले. आडगाव पासून बिलकस गाव ३ किलोमीटरवर वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. वळणावळणाचे रस्ते घनदाट झाडी, पक्ष्यांचे आवाज ऐकत मी बिलकसला पोहचलो. हे महाराष्ट्र हद्दीतले शेवटचे गाव.

सीमा रेषेवरील या गावी जाण्यास मी खूप उत्सुक होतो. काही वेळातच नदीवर पोहचलो. भर उन्हाळ्यातही नदीला असणारे भरपूर पाणी सुखावत होते. नदीत मनसोक्त पोचणारी बच्चे कंपनी दृष्टीस  पडत होती. कोणी उंच झाडावरून तर कोणी जागच्या जागी उड्या मारून पोहण्याचा आनंद घेत होते. त्यांचा सोबतील असणारी इतर मंडळी नदीच्या पाण्यात कपडे तसेच गुरे धुण्यात व्यस्त होती. चारही बाजूंनी असलेले मोठमोठ्या डोंगर रांगा लक्ष वेधून घेत होत्या. मधूनच पक्ष्यांचे मधुर कुंजन प्रफुल्लित करत होते. हे सारेच एकाद्या चित्रपटाला शोभावे असे दृश्य होते.

महाराष्ट्र व गुजरात हद्द

नदीच्या ह्या कडेला उभे असल्यास तुम्ही महाराष्ट्रात असतात व दुसऱ्या कडेला गेल्यास तुम्ही गुजरात राज्यात जातात. मोबाईलच्या नेटवर्कचेही असेच. नदीपार झालो की मोबाईलमध्ये गुजरात राज्याचे नेटवर्क दिसते. हा अनुभव मजेशीर होता. २ पावलं चालून मीही गुजरात राज्यात जाण्याचा अनुभव घेऊन आलो. गुजराती आदिवासी लोकांचा पोशाख टिपीकल गुजराती होता तर आपल्या लोकांचा महाराष्ट्रीयन. बिलकस मधील गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी काही ‘किस्से’ सांगितले. जेव्हा गावात ‘लोडशेडिंग’ असते आणि मोबाईल चार्जिंग करायचा असतो तेव्हा \आम्ही नदी ओलांडून गुजरातमध्ये जाऊन फोन चार्जे करतो.

तेथून आडगावला परतलो व परतीचा प्रवास सुरु झाला. ८ किलोमीटर अंतर पार करून पेठ तालुक्यात आलो. तेथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. तेथे फक्त १ महिला कर्मचारी आढळून आली. अन्य कोणीही तिथे दिसले नाही. डॉक्टरांची विचारणा केली असता ते सध्या येथे नाही असे सांगण्यात आले. हे जाणून घेत मी पुढच्या प्रवासाला निघालो.

नाशिक-पेठ रस्ता चौपदरी करण्याचे सुरु असलेले काम

सध्या नाशिक-पेठ रस्ता चौपदरी करण्याचे काम मागील १ ते १.५ वर्षांपासून सुरु आहे. पेठ पासून उमराळे व तेथून पुढे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्णत्वाला यावे अशी त्यांची इच्छा आहे.

-गौरव परदेशी, देशदूत डिजिटल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!