स्मार्टफोन आले; पण शौचालयाची अजूनही सोय नाही

0

देशदूतने मध्यंतरी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून विविध सरकारी योजना आणि गावांच्या विकासाची स्थिती जाणून घेतली. आमच्या रिपोर्टरच्या डायरीचे ‘त्र्यंबकेश्‍वर’ तालुक्यातील ‘हरसूल’ परिसरातील स्थितीचे हे प्रकरण.

यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात भल्या सकाळी बाहेर पडलो. गंगापूर धरणाकडे दुचाकी सुसाट सोडली. नाशिक मागे जाताना ट्रॅफिक कमी होत गेली आणि पक्षांचे सु-मधुर आवाज कानी पडायला लागले. गिरणारे गाव ओलांडल्यावर काश्यपी धरणाचा विस्तीर्ण जलाशय डोळ्यांना गारवा देऊन गेला. थोडे पुढे गेल्यावर एक महिला व तिच्या सोबतीला ३-४ वर्षाची चिमुरडी डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहताना दिसली. शेजारी धरणाचे पाणी असूनही त्यांच्या वस्तीत पाण्याचा दुष्काळ होता. परिणामी थेट धरणातूनच त्यांना पाणी वाहावे लागत होते.
हंडा घेऊन पाणी वाहताना महिला व चिमुरडी

तसाच पुढे निघालो. साधारण १५-२० किलोमीटर अंतररावर डाव्या बाजूला भल्या मोठ्या यंत्राने डोंगर पोखरण्याचे काम सुरू होते. तिकडे दुर्लक्ष केले. तसाच पुढे निघालो. आता सूर्य बऱ्यापैकी आग ओकायला लागला होता.

रस्त्याचा कडेला पोखरलेला डोंगर

हरसूल २० किलोमीटर वर असताना ‘वाघेरा घाट’ लागला. तेथे हनुमान माकडांचा (सेम्नोपिथेकस एन्टेलस) भला मोठा जत्था येणाऱ्या जाणाऱ्यांकडून न भीता फळे व इतर खाण्याचे पदार्थ घेताना दिसला. तर काही तरूण सेल्फीची भूक भागविताना दिसले.

पुढे हरसूल गावात पोहचलो. तेथील मित्राची भेट झाली. गावातच एक लग्न होते. तिथे तो घेऊन गेला. सख्ये बहीण-भाव एकाच मांडवात आपल्या जोडीदारांना सोबत बोहल्यावर चढणार होते. दहा बाय दहाचा छोटासा मंडप आणि शे सव्वाशेंचा गोतावळा. सगळा साधा मामला दिसला. पारंपरिक संबळ वाजत होते. डाळ भात, वांगे-बटाट्याची भाजी आणि बुंदी असा सुटसुटीत मेन्यू. खर्च आणि भपकेबाजपणा टाळून आदिवासी ग्रामीण भागात अजूनही अशी लग्नं लागतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

तेथून पुढे हरसूलच्या बाजार पेठेत आम्ही गेलो. आदिवासी भाग असला, तरी येथेही आता मोबाईल, सीमकार्डची दुकाने आली आहेत. लोक स्मार्टफोनचा वापर करू लागली आहे. मोबाईल इंटरनेट इथेही पोहोचले इतकेच नव्हे, तर या भागातील लोकांचे आता व्हॉटस्‌अप ग्रुपही आहेत. हफ्त्यावरही इथे मोबाईल मिळतात. बाजूच्या पाड्यांवरून लोक येथे रिचार्ज करायला येतात.

आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलो. रसाचे दुकान चालवणाऱ्या अनिता कांबळी यांच्याशी ओळख झाली. त्या हरसूल पासून १० किलोमीटरवरील ‘हातलोंढी’ पाड्यावरील उपसरपंच होत्या. गप्पा रमल्यावर त्यांनी त्यांच्या पाड्यावरील समस्या सांगण्यास सुरुवात केली. गावातील आपापसातील राजकारणामुळे पाड्याचा विकास मंदावला होता. त्यात ग्रामसेवकाचा मनमानी कारभार डोकेदुखी झाला होता. या सर्वांवर तोडगा म्हणून महिन्यातून एकदा सरकारच्या कोणी प्रतिनिधीने येऊन कामकाजाची पाहणी करावी आणि ग्रामस्थांसोबत चर्चा करून समस्यांचा आणि कामाचा आढावा घ्यावा असे त्यांचे म्हणणे पडले.
हातलोंडी पाड्यावरील उपसरपंच, अनिता कामडी

हरसूल हे साधारणतः ७००० ते ७५०० हजार लोक संख्येचे गाव. आजूबाजूच्या खेड्यांसाठी हे गाव बाजारापेठेचे. दररोज येथे अनेक व्यावसायिक येऊन व्यवसाय करतात. आणि त्यातूनच हजारो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु येथील बाजारपेठेत एकही सार्वजनिक शौचालय नाही. याचा जास्त त्रास महिला वर्गाला होतो.

काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीद्वारे दररोज व्यावसायिकांकडून कर गोळा केला जायचा. परंतु सर्व व्यावसायिकांनी याचा तीव्र विरोध करून हा कर आठवड्यातून २ दिवसांवर आणला. वेळोवेळी कर भरून देखील मुलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने व्यावसायिक व ग्राहकांमध्ये नाराजी आहे. ग्रामपंचायतीने शौचालय बांधून हवे तर वापरणाऱ्याकडून भाडे आकारावे असा उपाय एका महिला व्यावसायिकांने सुचवला. सध्या गाजावाजा सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानातील शौचालय इथपर्यंत अजून पोहोचलेच नसल्याचे दिसून आले. अगदी मुलभूत सुविधाही या ठिकाणी अजून नागरिकांना मिळालेल्या नाहीत,  याची खंत इथे आल्यावर नक्कीच जाणवते.

प्रतिनिधी

LEAVE A REPLY

*