Type to search

मोगऱ्याचा सुगंध आणि हागणदारीचा दुर्गंध

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

मोगऱ्याचा सुगंध आणि हागणदारीचा दुर्गंध

Share

नाशिक जिल्ह्यामध्ये विकासप्रक्रिया कशी सुरू आहे? सरकारी योजनांची काय स्थिती आहे. शेतकऱ्यांसह लोकांना या योजनांचा लाभ होतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महिन्यात आम्ही जिल्ह्यातील अनेक गावांत फिरलो आणि या रिपोर्टरच्या डायरीत त्याची नोंद करत गेलो. त्या डायरीचे हे पहिले प्रकरण

मे महिना संपून जूनला सुरूवात झाली होती. नाशिकहून दिंडोरी मार्गे वणीत पोहोचलो. तेथून पुढे घाटमाथ्यावर आल्यानंतर एके ठिकाणी मोगऱ्याचा सुगंध जाणवला. राणी आणि मनी या दोन्ही मुली मोगऱ्याचे गजरे रस्त्यावर विकत उभ्या होत्या.

त्यांच्याजवळ गेल्यानंतर समजले की सकाळपासून एकही गजरा विक्री झालेला नाही. राणी म्हणाली एकतरी गजरा घ्या…गजरा न घेता तिला गजऱ्याचे पैसे दिले आणि पुढे मार्गस्थ झालो.

घाटात एक आदिवासी जोडपे साहेबराव बहिरम आणि त्यांची पत्नी उसाच्या रसाचे दुकान चालवतात. सापुतारा, नांदूरीगडावर जाणारे भाविक याठिकाणी आवर्जून थांबतात. उसाचा रस प्यायल्यानंतर घाट चढण्यासाठी प्रारंभ करतात.

दररोज २०० ग्लास उसाचा रस हमखास विकला जातो असे साहेबराव आवर्जून सांगतात. त्यांचे मूळगाव कळवण तालुक्यातील दरेगाव.

या गावात जवळपास दुधाची डेअरी नसल्यामुळे गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ घरी खवा बनवतात. वणी, कळवण आणि नाशिक येथील अनेक व्यावसायिक आठवड्याला येथे येऊन खवा घेऊन जातात.

साधारणत: दोन लिटर दूध आटवून एक किलो खवा तयार होतो, असे साहेबरावांच्या पत्नीने सांगितले. त्याची २५० रुपये किलोने विक्री होते. नियमित येणाऱ्या व्यापाऱ्यांना सवलतीत खवा देतो असेही त्या म्हणाल्या.

साहेबराव बहिरम, दरेगाव, ता. कळवण

दरेगावाची लोकसंख्या अवघी हजार बाराशे असेल. दुर्गम भागांत वसलेले आणि धड रस्त्याही नसलेले. येथे काही ग्रामस्थांनी अनुदानातून शौचालयांचे बांधकाम केले आहे.

तर काही बांधण्याच्या तयारीत आहेत. हा परिसर आदिवासीबहुल आहे. येथे पावसाळ्यात भात, नागली पिके घेतात. हिवाळ्यात पाण्याची पातळी कमी होते. मग येथील अनेकजण शेजारील गावांत मोलमजुरीसाठी जातात, तर काहीजण स्वतःचा व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करतात.

गावात पिठाची गिरणी, किरणा दुकाने आहेत. मांसविक्रीदेखील याठिकाणी होते. दरेगावला डोंगरांनी तिन्ही बाजूंनी वेढा घातला आहे. त्यामुळे डोंगराची काळी मैना संबोधल्या जाणाऱ्या करवंद विक्रीचा देखील याठिकाणी व्यवसाय काही आदिवासी करतात. त्यांचा दिनक्रम पहाटे चारपासून सुरु होतो.

घरकुल योजनेतून अनेक आदिवासींनी स्वतःची घरे बांधून घेतली आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेक घरांमध्ये गॅस सिलिंडर आलेली दिसतात. मात्र काहीजणच त्याचा वापर करतात. चुलीवर स्वयंपाकची सवय असल्यामुळे अनेकांनी अद्याप गॅस सुरू करूनच बघितला नाही. ‘पावसाळ्यात सरपण संपल्यावर मात्र गॅस सुरू करावेच लागतील’, अशी माहिती दरेगावमधील एका ग्रामपंचायत सदस्याने दिली.

दरेगावहून पुढे नांदुरीकडे निघालो. हासुद्धा आदिवासी बहुल भाग आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे याठिकाणी उतरत्या छपराची घरे आहेत. सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी भाविकांची नियमित वर्दळ याठिकाणी असते. त्यामुळे येथील अनेक आदिवासींनी स्वतःची हॉटेल उभारली आहेत. भांडवलाची कमतरता असल्यामुळे छोटेखानी स्वरूपात त्यांचे व्यवसाय सुरू आहेत.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत येणारे एक धरण दरेगावच्या नजीक आहे. तिथून नांदुरीला पाणीपुरवठा होतो. परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाकडे पैसे भरून थेट धरणातून पाईपलाईन करून घेतल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. नांदुरी गाव पूर्णपणे हागणदारी मुक्त झालेलं नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची बिकट अवस्था आहे. गावात प्रवेश केल्यानंतर आणि कळवणकडे जाताना काही ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावाच लागतो.

चैत्र पौर्णिमेला नांदुरी गावातून अनेक भाविक पायी सप्तशृंगी गडावर जातात. त्यावेळी याठिकाणी मोठी गर्दी होते. त्यावेळी देवीच्या ओटीपासून कापूर, कुंकू, अगरबत्ती इत्यादी पुजा साहित्य विक्रीची दुकाने याठिकाणी सजतात. इतर दिवस मात्र गर्दी मर्यादित असते. त्यामुळे हे व्यावसायिक आपली दुकाने बंद करतात.

अशी माहिती येथील हॉटेल चालक पांडुरंग अण्णा यांनी दिली. धरणाचे पाणी असल्यामुळे येथील काही शेतकरी भाजीपाल्याचीदेखील लागवड करतात. स्थानिक बाजारपेठेत किंवा वणी आणि कळवण येथील मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात. असे असले, तरी येथील एकूणच अर्थव्यवस्था ही शेजारच्या सप्तश्रृंगगडावर येणाऱ्या भाविकांवरच अवलंबून आहे, हे प्रकर्षाने जाणवले. तेथूनच पुढच्या गावचा रस्ता धरला. (क्रमश:)

– दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!