नाशिकचे धर्माधिकारी दांपत्य साकारतायत विक्रमी महारांगोळी

0

नाशिक, ता. १५ : अवयवदान आणि देहदानावर आधारित सामाजिक संदेश देणारी ५० बाय ५० फूट आकाराची भव्य रांगोळी २५०० चौरस फूट जागेत नाशिककर दांपत्य साकारत आहेत. सौ आसावरी आणि सतीश धर्माधिकारी असे या कलावंत दांपत्याचे नाव आहे.

सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत ३६० मिनिटांत गंगापूर रस्त्यावरील प्रसाद मंगल कार्यालययात आज ही रांगोळी साकारली जात असून या रांगोळीचा “वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् इंटरनॅशनल” आणि “गिनियस बुक ऑफ रेकॉर्डस् इंटरनॅशनल ” असे दोन जागतिक विक्रम नोंदवले जाण्याची अपेक्षा आहे. तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

या रांगोळीसाठी ४० किलोग्रॅम रंगाचा वापर झाला आहे.

आज संध्याकाळी 5:30 वाजता या महारांगोळीच्या प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उदघाटक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार भि.रा.सावंत, प्रफुल्ल सावंत,  राजेश सावंत तसेच ऋषिकेश हॉस्पिटल, गंगापूररोड चे संचालक डॉ.श्री. भाऊसाहेब मोरे, अवयवदाना साठी पदयात्रा करणारे सुनील देशपांडे, प्रसाद मंगल कार्यालयचे मुख्य जगदीश जोशी आदी मान्यवर असणार आहेत.

त्यानंतर शनिवार आणि रविवार सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खूले असणार आहे.अवयव दान हा विषय व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून रांगोळी बरोबरच, त्या विषयाची सखोल माहिती सांगण्यासाठी तज्ञ लोकांची टीम प्रदर्शन स्थळी सज्ज असणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही त्या ठिकाणी करण्यात आले आहे.

धर्माधिकारी पतीपत्नी  20 वर्षांपासून अविरतपणे, व्यावसायिक आणि सामाजिक रांगोळ्या काढत आहेत. आपली कला व्यावसायिक कारणांपुरती मर्यादित न राहता समाज हितासाठी देखील याचा काहीतरी उपयोग व्हावा या भावनेतून त्यांनी ही महारांगोळी काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*