नाशिककर गोदेच्या ऐलतीरी अधिकमास पैलतीरी रमजानचा महिना

0

देशदूत डिजिटल

नाशिक, ता. १७ : सांस्कृतिक आणि धार्मिक एकोपा जपणाऱ्या नाशिक शहरात गोदावरीमुळे तीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या शहरात आता हिंदूंचा अधिकमास आणि मुस्लिमांचा रमजान महिना एकाच वेळेस साजरा होत आहे.

त्यामुळे सर्व शहरात पवित्र धार्मिक वातावरण असून नागरिकांमध्ये सणामुळे उत्साह संचारला आहे. बुधवारपासून अधिक मास अर्थातच धोंड्याच्या महिन्याला सुरूवात झाली. त्यासाठी पंचवटी येथील रामकुंडावर स्नानासाठी भाविक गर्दी करत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारपासून रमजान महिना सुरू होत असून बाजारपेठा उपवासासाठीच्या खजूर, शेवया, सुकामेवा इत्यादी पदार्थांनी फुलल्या आहेत.

उद्यापासून गोदेकाठी उत्तरेकडे म्हणजेच पंचवटी परिसरात पहाटेपासून श्रीराम जयराम जय जय राम चा जयघोष कानी पडणार आहे, तर समोरच दक्षिण तीरी म्हणजेच कठडा, जुने नाशिक, भद्रकाली परिसरातील मशिदींमधून सहेरीची अजान ऐकू येणार आहे.

अधिक मासानिमित्त बत्तासे, अनारसे यासह तांब्याची भांडी, दिवे, पोथ्या, धार्मिक पुस्तके आणि साहित्यांनी रामकुंड परिसर, रविवार कारंजा, येथील दुकाने सजली आहेत. त्याचवेळेस शेजारीच असलेल्या दुधबाजार, भ्रद्रकाली मार्केट परिसर, फुले मार्केट परिसरात शेवया, खजूर आणि सहेरीसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

याच परिसरात शाही मस्जिद, जहाँगीर मस्जिदसारख्या अनेक मशीदी असून बडी दर्गाह शरीफ सारखे सर्व धर्मियांच्या आस्थेचे पवित्र ठिकाणही आहेत. दुसरीकडे पंचवटीतील काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, बालाजी कोटातील बालाजीमंदिर यासारखी मंदिरे असून येथील उत्सवात सर्व जाती-धर्माचे नाशिककर आवर्जून एकत्र सहभागी होताना दिसतात.

वेगवेगळ्या काळांत जनस्थान, गुलशनाबाद आणि आता नाशिक असे नाव धारण करणाऱ्या नाशिक शहराने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमातून सामाजिक एकोपा नेहमीच जपलेला दिसून येतो. त्यात आणि दोन्ही धर्मांचे पवित्र महिने एकत्र आल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.

LEAVE A REPLY

*