लोकअदालतीमध्ये 80 हजार खटले; मागील लोक अदालतीचा विक्रम मोडणार

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 9 डिसेंबर रोजी आयोजित महालोकअदालत खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. या लोकअदालतीमध्ये सुमारे 80 हजार खटले सादर होणार असून, त्यापैकी सुमारे 40 हजारांपेक्षा अधिक खटल्याचा निपटारा होण्याची शक्यता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

दावापूर्व आणि प्रलंबित खटल्यांतील दोघापैकी एका पार्टीने आताही संपर्क साधल्यास त्यांचा खटला सुनावणीसाठी घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमुळे 26 हजार 379 प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला गेला. यामध्ये दावा दाखलपूर्व 22 हजार 678 प्रकरणे तर कोर्टातील तीन हजार 701 प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर खटले लोक अदालतीत येणे आणि त्यावर तडजोड होणे, ही बाब राज्यपातळीवरील विक्रम ठरली होती.

आता 9 डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन होणार असून, याबाबत पत्रकार परिषदेत शिंदे यांनी सांगितले, की यावेळी लोकअदालतीत प्रलंबित आणि दावा पूर्व असे 80 हजार खटले सुनावणीसाठी यावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. वर्षानुवर्षे सुनावणीसाठी कोर्टात चकारा मारणे, यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणे हे नागरिकांनीच थांबवयला हवे.

महापालिका अथवा अन्य एखाद्या संस्थेचा कर कधीही माफ होत नाही. त्यात तडजोडच करावी लागते. हीच बाब मोटार वाहन अपघातात मिळणार्‍या भरपाईबाबतही लागू पडते. आज मिळणारी भरपाईची रक्कम सात ते आठ वर्षांनी पदरात पाडून घेण्यात कोणताही मतलब नसतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या लोकअदालतीचा अनुभव लक्षात घेता, कमकुवत दुव्यांमध्ये सुधारणा केल्या जातील. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात असणार असून, लोक अदालतीत सहभागी होणार्‍या प्रत्येक विभागाच्या बैठका घेण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी सांगितले.

जिल्हाभरात यासाठी जनजागृती केली जात आहे. मागील अदालतीची माहिती अनेकांना नव्हती परंतु आपण ज्या प्रकारे खटल्यांचा निपटारा करत आहोत. त्यावरून लोकांचा कल आता लोकअदालतीकडे वाढतो आहे. नागरीकांनी अंतिम दिवसापर्यंत अर्ज केल्यानंतरही आपण ते लोकअदालतीत घेणार आहोत. अधिकाधीक नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*