रकमा न दिल्यास बेमुदत उपोषण करणार

0

येवला । दि. 4 प्रतिनिधी
आशिया खंडात पपेन निर्मितीत नावलौकीक असलेल्या कोटमगाव येथील एन्झोकेम लॅबोरॅटरी कंपनीचे उत्पादन एप्रिल 2016 पासून बंद असल्याने कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कामगारांचे थकित पगार, भविष्य निर्वाह निधी, बोनस आदी रकमा कंपनीकडे थकित आहेत.

कंपनीचे संचालक असलेल्या दोन भावंडांच्या वादात कामगारांवर अन्याय होत असून थकित रकमा 15 दिवसांच्या आत न दिल्यास संचालकांच्या निवासस्थानासमोर भारतीय मजदूर संघाचे जिल्ह्यातील सर्व सभासद कंपनीच्या कामगारांसह बेमुदत उपोषणास बसून धरणे आंदोलन करतील, असा इशारा लेखी पत्रकाद्वारे नाशिक जिल्हा मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी विजय मोगल यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

एन्झोकेम लॅबोरॅटरी प्रा. लि. येवला या कंपनीचे संस्थापक स्व. सत्यनारायण वर्मा व स्व. बन्सीलाल सोनी यांनी मोठ्या त्यागातुन कंपनीचा वटवृक्ष करीत 200 कामगारांना कंपनीच्या माध्यमातुन रोजगार दिला. यात 25 टक्के आदिवासी कामगारांनाही रोजगार मिळाला.

कंपनीचे दोन्ही आधारस्तंभ गेल्यानंतर कंपनीचा कारभार नविन संचालक विक्रम वर्मा व भारत वर्मा या दोन भावंडांच्या हाती आला. सन 2012-13 पावेतो कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 18 कोटी रुपयापर्यंत होती. पपेन निर्मितीत आशिया खंडात नावलौकीक असल्याने कामगारांनाही प्रति 25 हजार रुपया पर्यंत निर्यातीचा बोनस मिळत होता.

परंतु संचालक असलेल्या दोन्ही भावंडांच्या एकमेकांवरील कुरघोडीनंतर कंपनीच्या प्रगतीत घसरण होऊ लागल्यानंतर संचालक विक्रम वर्मा यांनी कृष्णा एंन्झीटेक नावाची स्वत:ची कंपनी सुरु करुन एन्झोकेम लॅबोरॅटरी प्रा. लि. च्या उत्पादनावर गंडांतर आणले. सन 2013-14 व सन 2015-16 या दोन आर्थिक वर्षांमध्ये कृष्णा एंन्झीटेक कंपनीमुळे एन्झोकेम कंपनीचे उत्पादन कमी होऊन कंपनीला तोटा झाला. कंपनी तोट्यात दाखवून या दोन्ही भावंडांनी कामगारांची तीन वर्षांची पगार वाढ केली नाही व बोनसही दिला नाही.

एप्रिल 2016 पासून एन्झोकेम कंपनीला संचालक असलेल्या दोन्ही भावंडांनी टाळे ठोकले असून आज गेल्या दिड वर्षापासून कामगार घरी बसून आहे. संचालकांच्या वादात एन्झोकेम कंपनीचे कामगार रस्त्यावर आले असून यामुळे कायमस्वरुपी 20 कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. कामगारांचा थकित पगार मिळावा म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून नाशिक येथील उपकामगार आयुक्त यांच्याकडे कामगारांची तक्रार प्रलंबित आहे.

दुसरीकडे कंपनीचे संचालक असलेले दोनही भाऊ आपल्या भुमिकांवर ठाम आहे. कंपनी बंद पाडण्यास सर्वस्वी दोनही भावंडे जबाबदार असून कंपनीचे व्यवस्थापनही या दोनही भावंडांकडेच आहे. कंपनीची मशिनरी आजही उत्पादनासाठी उत्तम असून कामगारही काम करण्यासाठी सक्षम आहेत.

कामगारांचा तेरा महिन्यांचा थकित पगार, भविष्य निर्वाह निधी व सन 2015 चा बोनस कंपनी व्यवस्थापनाने त्वरीत द्यावा, अन्यथा एन्झोकेम कंपनीचे चेअरमन भारत वर्मा व मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम वर्मा या दोन्ही भावंडांच्या निवासस्थानासमोर भारतीय मजदूर संघ जिल्ह्यातील सभासदांसह कामगारांना घेवून बेमुदत उपोषणास व धरणे आंदोलनास बसतील, असा इशारा लेखी पत्रकात जिल्हा मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी विजय मोगल, वि. गो. पेंढारकर, श्रावण जावळे, शशिकांत मोरे, प्रशांत पाटील आदी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

कामगारांच्या गॅ्रज्युटीची रक्कम एल. आय. सी. कडे जमा असून त्याची व्यवस्था कंपनीची संस्थापक स्व. सत्यनारायण वर्मा व सतिष सोनी यांनी केलेली आहे. यामुळे कामगारांचा कायदेशीर पगार, भविष्य निर्वाह निधी, बोनस नुकसान भरपाई देवून या वादातुन कामगारांना मुक्त करावे, असे आवाहन जिल्हा मजदूर संघाने पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

*