दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची निदर्शने

0

नाशिक । दि. 27 प्रतिनिधी
राज्यात प्रचंड प्रमाणात पेट्रोल व डिझेलची वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. पेट्रोलची मूळ किंमत प्रतिलिटर 31 रुपये असताना 80 रुपये दराने त्याची विक्री सुरू आहे.

पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनावरील अन्य कर काढून केवळ जीएसटी लागू करावा तसेच इंधनाचे दर कमी करावेत या मागणीसाठी यूथ काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वारावरच रिकामे सिलिंडर, गॅस शेगडी आणि लाकडे मांडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्यात प्रचंड प्रमाणात इंधनाची दरवाढ लागू करण्यात आली असून महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकारने जनतेची लूट थांबवावी या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचा निषेध असो, फडणवीस सरकारचा निषेध असो यांसारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस सिलिंडर, शेगड्या आणि लाकूड रस्त्यावर मांडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या 72 दिवसांमध्ये इंधनाचे दर प्रतिलिटर 16 रुपयांनी वाढल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या दरवाढीमुळे जनतेच्या मनात रोषाचे वातावरण आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर साडेसहाशे रुपयांच्या वर गेले आहेत.

इंधनाच्या किमती सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत कडधान्ये, तेल, तुपाच्या किमती वाढल्या आहेत. रेशन दुकानांवर साखर तसेच धान्य मिळणेही कमी झाले आहे. या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*