शाळा बंदच्या निर्णयाविरोधात परिपत्रकाची होळी

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील 1300 शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटनेच्या वतीने शासन परिपत्रकांची होळी करण्यात आली. शाळांच्या खासगीकरणाला चालना देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शालिमार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी शाळा बंदच्या निर्णयाच्या शासन परिपत्रकाची होळी करत सदरचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद, ग्रामीण भागातील अनुदानित सुमारे 1300 शाळांत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या आत आहे.

कमी गुणवत्तेमुळेच या शाळांची पटसंख्या घटल्याचा निष्कर्ष काढून त्या बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी केंद्रात एक मिनीट जरी उशिराने पोहोचला तरी त्याला प्रवेश नाकारण्यात येईल, असा फतवाच शिक्षणमंत्र्यांनी काढल्याने या निर्णयाचाही छात्रभारतीने निषेध नोंदवला.

या शाळा बंद करून शिक्षण क्षेत्रातील खासगीकरणाला चालना देण्याचा शासनाच डाव असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शिक्षणाचा दर्जा आणि पटसंख्येचे कारण देत जर शाळा बंद केल्या जात असतील तर मागील तीन वर्षांपासून पटसंख्या व दर्जा वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न का नाही केले, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या शाळा बंद केल्याने या शाळेत जी मुले शिकतात त्यांच्या पालकांना भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. शिक्षण क्षेत्राचा ‘विनोद’ करू नये, असा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी राकेश पवार, समाधान बागुल, राम सूर्यवंशी, सागर निकम, विशाल रणमाळे, आम्रपाली वाकळे, देवीदास हजारे, सदाशिव गणगे, कोमल गांगुर्डे, निवृत्ती खेताडे, सचिन भुसारे, रोशन वाघ, राज देशमुख, दीपक देवरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*