संरक्षण साहित्य उद्योग क्षेत्राला मिळणार ऊर्जितावस्था

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
भारतीय संरक्षण दलास लागणारे बहुतांश महत्त्वपूर्ण युद्ध साहित्य देशातच तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संरक्षण खात्याने घेतल्याने या क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळणार असून अधिकाधिक उद्योजकांनी यात योगदान द्यावे, असे आवाहन उद्योजकांना करण्यात आले.

उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेमध्ये डिफेन्स इनोव्हेटर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री असोसिएशनच्या (डीआयआयए) वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय नौका दलातील निवृत्त अधिकारी मधुसूदन नायर, हर्षवर्धन गुणे, कौस्तुभ बोरा यांनी उपस्थित उद्योजकांना संरक्षण उद्योग क्षेत्रातील संधींची माहिती दिली.

या चर्चासत्रामध्ये विनय चौधरी, जे.पी. बेहरा, डॉ. विक्रांत सावकार, अजित पाटील, संकेत अंबेकर, जयंत खेडकर, सुदाम महाले, धीरज पिचा आणि संजय देशपांडे आदी उद्योजक सहभागी झाले होते.

कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास भारतीय सैन्य दल तयारी करत आहे. मात्र संरक्षण साहित्यामध्ये आयातीचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक आहे. याचा परिणाम सक्षमीकरणावर होत आहे.

यामुळे लहान उपकरणांची निर्मिती करण्यावर भारतीय लष्कराचा मानस असून याबाबत मेक इन इंडियाअंतर्गत संरक्षण खात्याने काही धोरणात्मक निर्णय घेत खासगी क्षेत्रालाही संरक्षण साहित्य उत्पादन निर्मितीची कवाडे खुली केली आहेत. या निर्णयामुळे आयातीवर होणारा खर्च कमी होईल.

त्याचबरोबर देशांतर्गत उद्योगालाही चालना मिळणार आहे, हा यामागचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेमध्ये डिफेन्स इनोव्हेटर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री असोसिएशनने (डीआयआयए) पुढाकार घेतला असून आता देशभरात या संघटनेमार्फत उद्योजकांना जोडण्याचे काम सुरू केले आहे.

संरक्षण उद्योग क्षेत्रात एक हजार मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असून त्यामुळे उद्योजकांना उद्योगवाढीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ उठवून संरक्षणविषयक सामुग्री निर्मितीत भारताला स्वयंभू करण्यात उद्योजकांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पुणे येथे 21 डिसेंबर रोजी मोठी परिषद बोलावण्यात आली आहे. अधिकाधिक उद्योजक डीआयआयएचे सभासद व्हावेत आणि या परिषदेमध्ये उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

*