अस्वच्छतेप्रश्नी खाजगी जागा मालकांना बजावणार नोटीसा

0

नाशिक । दि. 30 प्रतिनिधी

विभागातील खाजगी भुखंडावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून संबधित जागा मालकांना अस्वच्छतेप्रश्नी नोटीसा बजावण्यासह दंड आकारण्याचा निर्णय नाशिक महापालिका पश्चिम प्रभाग सभेच्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची सभा सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती डॉ. पाटील यांनी विभागातील खासगी मालकीच्या खुल्या जागांवर होणारी अस्वच्छता पाहता संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेशित केले.

योगेश हिरे यांनी, सदर भूखंडांची साफसफाई महापालिकेने करावी आणि त्याबाबतचे शुल्क संबंधित भूखंडमालकांकडून वसूल करावे. ज्यावेळी भूखंडमालक प्लॉटवर बांधकामासाठी परवानगी घ्यायला येईल, त्यावेळी त्याच्याकडून सदर वसुली करण्याची सूचनाही हिरे यांनी केली. वृक्षछाटणीसाठी गाडयाच उपलब्ध होत नसल्याची तक्रार नगरसेवक समीर कांबळे यांनी केली. मात्र पश्चिम प्रभागात अवघ्या चार गाडया उपलब्ध असल्याची कबुली यावेळी अधिकारयांनी दिली.

पथदीप तसेच विद्युत तारांभोवती असणार्‍या  वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी घेण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने वृक्षछाटणीसंबंधीची परवानगी विभागीय स्तरावरच मिळण्याबाबतचा ठराव पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत करण्यात आला.

दरम्यान, रस्त्यांवरील दुभाजकांच्या देखभालीकडे संबंधित प्रायोजकांचे दुर्लक्ष होत असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. वृक्ष छाटणीबाबतही कारवाई होत नसल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले. मात्र वृक्षछाटणीसाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी घ्यावी लागते.

प्राधिकरणची सभा दर महिन्याला एकदा होते. छाटणीचा प्रस्ताव दिल्यानंतर मंजुरीसह त्याबाबतचा ठराव प्राप्त होईपर्यंत बराच अवधी निघून जातो. त्यामुळे छाटणीस विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण उद्यान निरीक्षकांनी केल्यानंतर, सभापतींनी विभागीय स्तरावरच आवश्यक त्या ठिकाणी वृक्षछाटणीची परवानगी मिळावी यासाठी ठराव केला. यावेळी दुभाजकांच्या साफसफाईचा मुददाही चर्चिला गेला.

यावेळी प्रयोजकांकडून दुभाजकांची स्वच्छता केली जात नसल्याची बाब निदर्शनास आणून दिले. अशा प्रायोजकांची यादी तयार करून त्यांची बैठक घेवून सुचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभागांमध्ये ठेकेदारामार्फत डस्टबीन पुरविल्या जात असताना त्याची काहीही माहिती नगरसेवकांना दिली जात नसल्याची तक्रार स्वाती भामरे यांनी केली.

त्यावर सभापतींनी आरोग्य विभागाकडून माहिती मागविली व डस्टबीनमुळे पुन्हा कचरा कुंड्यांना निमंत्रण देऊ नका, असेही सुनावले. सभेला, योगेश हिरे, प्रियंका घाटे, वत्सला खैरे, हिमगौरी अहेर-आडके, समीर कांबळे, स्वाती भामरे आदीसह अधिकारी उपस्थित होेते.

LEAVE A REPLY

*