बॉटनिकल गार्डन मधील रोपवाटिकेची दुर्दशा

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी):- गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डन मधील पॉलिहाऊस सह बोन्साय हाऊस ची देखभाली अभावी दुर्दशा झाली असून या दोन्ही विभागांना नवनिर्माणाची प्रतीक्षा असल्यासारखी स्थिती आहे.

पांडवलेण्याच्या पायथ्यालगत 93 हेक्टर च्या विस्तीर्ण भूभागावर विस्तारलेल्या वनौषधींच्या जंगलाला आधुनिकतेचा साज चढवून त्याला बॉटनिकल गार्डन मध्ये परावर्तीत करण्यात आले. त्यातच बोलक्या झाडांचा आगळा वेगळा प्रयोग केल्याने अल्पावधीतच नाशिककरांसह पर्यटकांची पावले बॉटनिकल गार्डन कडे वळू लागली.

निसर्गाच्या वरदहस्ताने बहरलेल्या जंगल संपदेचा आनंदानुभव घेण्याची संधी यानिमित्ताने नाशिककरांना आणि पर्यटकांना मिळाली.

शासनाच्या वनविभागाच्या देखरेखीखाली या परिसरात उपलब्ध होणार्‍या वनौषधींची रोपे तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून साडेचार ते पाच गुंठे जमिनीवर भव्य पॉलिहाऊस उभारण्यात आले. तर बोन्साय प्रकारातील झाडांच्या निर्मितीसाठी स्वतंत्र बोन्साय हाउस उभारण्यात आले. सद्यस्थितीत वन विभागाकडून या परिसराचे हस्तातरण वनविकास महामंडळाकडे करण्यात आले आहे. मात्र निधीच्या तुटवड्यामुळे हे पॉलिहाऊस व बोन्साय हाउस सद्यस्थितीत अखेरच्या घटका मोजत आहेत.

येथील हजारो रोपे देखभाली अभावी मरणयातना सोसत आहेत तर शेकडो रोपांनी केव्हाच मान टाकली आहे. पॉलिहाऊस मध्ये तर गाजरगावताचेच साम्राज्य वाढले असून रोपनिर्मितीसाठी तयार केलेले ’बेड’ रिकामे पडले आहेत. प्रत्यक्ष पॉलिहाऊसची देखील दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी फाटलेल्या छतामुळे त्याचे रूपांतर चंद्रमौळी झोपडीत झाले आहे. प्रवेशद्वार बंद करून ठेवले असले तरी ठिकठिकाणी तुटलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेने पॉलिहाऊसमध्ये विनासायास प्रवेशाची अनेक ठिकाणे तयार झाली आहेत.

वनविकास महामंडळाकडून देखभाल केली जात असली तरी सद्यस्थितीत निधीची उपलब्धता होत नसल्याने पॉलिहाऊसचे नूतनीकरण लांबले आहे.नूतनीकरण झाल्यानंतर हा विभाग चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केला जाईल. सध्या उपलब्ध असलेल्या वन औषधींचा उपयोग गरजू नागरिकांसाठी केला जात आहे.पॉलिहाऊस लगतच निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून लवकरच या केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना वाईल्ड लाईफ ची माहिती उपलब्ध होणार आहे.
-प्रविण ढमाळे,वनपरिक्षेत्र अधिकारी.

LEAVE A REPLY

*