नासाकाचे ऊस उत्पादक दुहेरी संकटात

0

वार्तापत्र | सुधाकर गोडसे

चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या प्रमुख 60 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असून कारखान्याचा गळीत हंगाम यंदाही सुरू झाला नसल्याने बाहेरील तीन कारखाने ऊसतोड करत आहेत.

मात्र एक लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊस सदर कारखाने तोडणार नसल्याने उर्वरित दोन लाख मे.टन गाळपाविना शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सदर ऊसाचे काय करावयाचे, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकर्‍यांपुढे ‘आ’ वासून उभा राहिला आहे.

2013-14 नंतर आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला नासाका सुरू करणेबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निर्धार केला होता. त्यानुसार जानेवारी 2017 मध्ये भाजपा प्रणित प्राधिकृत मंडळाची नियुक्ती सहकार मंत्र्यांनी केली. पदवीधर मतदार संघाच्या आचारसंहितेमुळे सदर मंडळाला केवळ पाच महिने काम करण्याची संधी मिळाली.

या कालावधीत मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड, असा धडक कार्यक्रम राबविला गेला. नोव्हेंबरमध्ये कारखाना सुरू होणार असे जाहीर केल्याने कार्यक्षेत्रात अडीच ते 3 लाख मे.टन ऊस उभा राहिला. परतीच्या पावसाने ऊसाला पोषक वातावरण निर्माण होऊन त्याची वाढ झाल्याने वजनामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे तीन लाखाचा आकडा साडेतीन लाखावर जाऊ शकतो.

सध्या नासाका कार्यक्षेत्रात ऊस असलेल्या प्रमुख गावांपैकी कोटमगाव, चाडेगाव, सामनगाव, हिंगणवेढे, एकलहरे, जाखोरी, चांदगिरी, शिंदे, मोहगाव, बाभळेश्वर, शेवगे दारणा, नानेगाव, नायगाव, जोगलटेंभी, सोनगिरी, ब्राह्मणवाडे, पांढुर्ली, आगासखिंड, बेलू, साकूर, शेणीत, भरवीर, निनावी, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, खेड, धामणी, धामणगाव, अडसरे, अस्वली, भगूर, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे याशिवाय सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी, वडांगळी, खडांगळी, किर्तांगळी, हिवरगाव, मुसळगाव, कोनांबे येथे प्रवरा, अगस्ती, संगमनेर या कारखान्याच्या तोडी चालू आहेत. यंदा राज्यात ऊसाची मुबलक उपलब्धता असल्याने सदरचे कारखाने जानेवारीनंतर आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्र संपविण्याकडे लक्ष देतील.

आज नासाका कार्यक्षेत्रातील दररोज एक हजार मे.टन ऊसतोड होत आहे. डिसेंबर, जानेवारीपर्यंत एक ते दीड लाखापर्यंत ऊसतोड होऊ शकते. त्यानंतर ऊसतोड बंद झाल्यास सुमारे दोन लाखापर्यंत ऊस गाळपाविना शिल्लक राहण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. चालू वर्षी जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे पीक कर्ज अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वभांडवलातून शेतकर्‍यांनी ऊस पीकाची निर्मिती केली आहे.

त्यातही ऊसतोड न झाल्यास केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. अथवा मातीमोल भावाने चार्‍यासाठी हा ऊस द्यावा लागेल. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे कारखाना सुरू होण्याकडे लागले आहेत. जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार निफाड व नासाका कार्यक्षेत्रात अंदाजे 12 लाख मे.टन ऊस उभा आहे. यापैकी बाहेरील कारखाने किती ऊसाचे गाळप करतात व उर्वरित ऊसाबाबत काय धोरण आखतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*