पावसाची आठवडाभर ओढ; परिस्थिती पाहून पेरण्या करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

0

नाशिक, ता. २ : कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्याने मॉन्सूनची वाटचाल पुन्हा एकदा मंदावली असून उत्तर महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना आठवडाभर पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मात्र ४ ते ६ जुलै दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही पावसाचा शिडकावा होऊ शकतो, अशी शक्यता हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे. मात्र या पावसाचा शेतीसाठी उपयोग होणार नसून शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असा सावधतेचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

श्री. जोहरे म्हणाले, की मॉन्सूनबद्दल अजूनही हवमान खाते दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या आठवड्यातही दमदार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हंगामी पिके (भाजीपाला, पालेभाजी वगैरे) घेतली असतील, त्यांनी त्यांच्यासाठी संरक्षित पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

कपाशी, मका, सोयाबीन तसेच कडधान्य पिकांना दोन आठवड्यापर्यंत पाण्याचा ताण सहन होतो. त्यामुळे ज्यांच्याकडे अशी पिके आहेत, त्यांची तूर्तास काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ज्यांनी वांगी, पालक अशी भाजीपाला पिके घेतली असतील, त्यांनी मात्र या पिकांसाठी संरक्षित पाण्याची सोय करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात जैन इरिगेशन चे वरिष्ठ कृषी संशोधक बी.डी.जडे म्हणाले की पाऊस चांगला झाल्यास १५ जुलै पर्यंत सर्व प्रकारची पिके शेतकरी घेऊ शकतात. मात्र त्यानंतर जर पावसाने ओढ दिली, तर मात्र शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा विचार करावा लागेल. त्यासाठी बाजरी, मका, सूर्यफुल अशी पिके शेतकऱ्यांना घेता येतील.

ज्यांच्याकडे विहिर, शेततळे यांसारखे संरक्षित पाणी असेल, त्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जमिन ठिबकखाली आणावी असे आवाहनही त्यांनी केले. संरक्षित पाण्यावर कांदा, भाजीपाला पिके घेता येऊ शकतात असा सल्लाही श्री. जडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*