नाशिकमधील अवैध वाळू उपशावर राहणार आता ‘ऑनलाईन वॉच’

गौण खनिज नियंत्रण नियमावली कार्यान्वित

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी

जिल्हा खनिज कर्म विभागाने अवैध वाळू उपश्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गौण खनिज उत्खनन नियंत्रण नियमावली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येऊन उत्खननापासून ते वाहतुकीपर्यंच्या प्रक्रियेवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

नुकतीच शासनानेही अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्याकरिता रेती धोरण निश्चित केले आहे. आता खनिज कर्म विभागाने ही प्रणाली कार्यान्वित केल्याने अवैध वाळू उत्खननास तसेच वाहतुकीस चाप बसेल अशी अपेक्षा आहे.

शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. सद्यस्थितीत गौण खनिज वाहतूकदाराकडे खनिकर्म विभागाने पावती पुस्तक दिले आहे. वाहतूक केले जाणारे गौण खनिज, त्यासाठी वापरात येणारे वाहन, चालकाचे नाव, मोबाईल क्रमांक व तत्सम आवश्यक माहिती त्यावर हाताने भरली जाते.

हीच माहिती आता संबंधित ठेकेदाराला त्याचवेळी www.mahamining.com प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य आहे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही प्रणाली विकसित केली असून त्यावर माहिती अपलोड करताच संबंधिताना युनिक आयडेंटिटी नंबर दिला जातो. तो नंबर वाहतूकदाराला पावतीवर नोंदवावा लागतो.

बारकोडद्वारे हा क्रमांक लिंक होतो. तपासणीसाठी महसूल विभागाने संबंधित वाहन अडविले की, बारकोड स्कॅनद्वारे क्षणार्धात संबंधित वाहतुकीबाबतचे तपशील समजतात. चालकाने पावती दाखविली नाही तरी वाहनाच्या क्रमांकावरूनही वाहतुकीबाबतचा इत्यंभूत तपशील प्राप्त होतो.

मर्यादेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. संबंधित वाहनास नमूद मार्गावर ताशी किमान 20 किलोमीटरने  प्रवासाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारित ठिकाणी त्या वेळेत वाहन पोहोचले नाही तर ते चौकशीच्या फेर्‍यात अडकू शकते.

वाहनाने मार्ग बदलला तरीही त्याचे कारण लगेचच अपडेट करावे लागले. वाहन नादुरूस्त झाले किंवा तत्सम अडचणी उदभवल्या तर त्याची माहितीही त्या लगेचच प्रणालीवर अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यामुळे चोरट्या मार्गांनी होणार्‍या वाहतुकीला चाप बसेल, असा  विश्वास यंत्रणा व्यक्त करीत आहे.

या प्रणालीमुळे चोरट्या वाहतुकीला आळा बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रणाली वापरास नुकतीच सुरुवात केली आहे. यापूर्वी जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केल्याच्या कारणावरून पथकावर हल्ले करण्याचे प्रकार घडले आहे. मात्र आता ऑनलाईन वॉच ठेवला जाणार असल्याने यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

प्रशांत कोरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी

LEAVE A REPLY

*