आधी विकायचे पिझ्झा; नंतर झाले उद्योजक

0

यशासाठी कठोर परिश्रम आणि योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोखीम उचलणे होय.

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक माईक इलिच यांची यशोगाथा याभोवतीच घुटमळली आहे. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले, मात्र त्यांनी जोखीम घेण्याचे टाळले नाही. कर्जबाजारीपणामुळे त्यांना घरातील फर्निचर विकावे लागले, परंतु ते परिस्थितीसमोर झुकले नाहीत.

पिझ्झा विकून व्यवसाय सुरू करणारे माईक इलिच हे आज समाजकार्यातही आघाडीवर आहेत. माईक इलिच यांचा जन्म डेट्राईटमध्ये झाला.

त्यांचे वडिल सामान्य व्यक्ती होते. अमेरिकी नौदलात चार वर्षे नोकरी केल्यानंतर माईक इलिच यांनी डेट्राईट टायगर्स बेसबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र गुडघ्याला मार लागल्याने त्यांना खेळ सोडावा लागला आणि सेल्समनची नोकरी धरली.

त्यानंतर पत्नीच्या मदतीने पिझ्झा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तत्कालिन काळात फास्टफूडचा व्यवसाय वेगाने वाढेल, असे सांगितले जात होते. मिशिनगच्या गार्डनसिटीमध्ये लिटिल सिजर्स पिझ्झा ट्रिट नावाने त्यांनी रेस्टॉरंट सुरू केले.

सुरवातीला काही प्रमाणात त्यांना आर्थिक फटका बसला आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांना घरातील फर्निचरही विकावे लागले. मात्र त्यांनी हार मानली नाही. माईक हे केवळ कमी किंमतीत पिझ्झा विकत नव्हते तर ग्राहकांना खावू घालण्यापेक्षा आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून ते पिझ्झा सादर करत होते.

त्यामुळे माईक यांना रेस्टारंटमध्ये फारसे कर्मचारी ठेवावे लागले नाही. पुढील काही वर्षात चार मोठ्या देशात अडीच हजार पिझ्झा रेस्टारंट सुरू झाले. 1982 मध्ये त्यांनी डेट्राइट रेड विंग्ज हॉकी क्लबची खरेदी केली. या टिमला फारसे महत्त्व नव्हते.

मात्र कालांतराने नॅशनल हॉकी लिगमधील सर्वात महागडी फ्रंचाईजी असणारी टिम बनली होती. अशा काळातच 1987 मध्ये फॉक्स थिएटर्सची खरेदी केली. त्यावेळी फॉक्सची स्थिती वाईट होती. अनेकांनी त्यांच्या निर्णयावर टीका केली होती.

मात्र मेहनतीच्या जोरावर माईक यांनी फॉक्सला पुर्नवैभव मिळवून दिले. 1999 मध्ये त्यांनी इलिच होल्डिंग्जची स्थापना केली. एकामागून एक यशाची शिखरे पादाक्रांत करणार्‍या इलिच यांनी मात्र भूतकाळाचा कधीही विसर पडू दिला नाही.

या भावनेतून त्यांनी आपल्या समाजातील लोकांसाठी मदत केलीच त्याचबरोबर गरजूंसाठी देखील पुढाकार घेतला. 1985 मध्ये लिटिल सिजर्स लव किचनची सुरवात केली आणि त्या माध्यमातून गरीबांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले. 2008 मध्ये त्यांनी लिटल चॅरिटीजची सुरवात केली. या माध्यमातून अनाथ, बेरोजगार, निराधार, निराश्रीत नागरिकांना मदत केली जावू लागली.

डेट्राईट शहराने इलिच यांना भरभरून दिले. त्याची भरपाई म्हणून शहराच्या विकास कामासाठी देखील त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. जोखीम उचलल्याशिवाय व्यापारात फायदा मिळत नाही, ही गोष्टी त्यांनी अनुभवातून शिकली, असे इलिच म्हणतात.

LEAVE A REPLY

*