मोहदरी घाटात वळणावरून कार कोसळली; नशीब बलवत्तर म्हणून ५० फूट खोल पडूनही चालक बचावला

0
सिन्नर l वार्ताहर- नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज दि.१६ सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास मोहदरी घाटातील अपघाती वळणावरून नाशिकच्या दिशेने जाणारी भरधाव होंडा सिटी कार सुमारे ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. शिंदे येथील कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करणारी शहा नामक व्यक्ती हि कार चालवत होते. ते कारमध्ये एकटेच होते व सुदैवाने सीटबेल्ट बांधलेला असल्याने व अपघात झाल्यावर कारच्या एअरबॅग उघडल्याने केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले.

मोहदरी घाटात नाशिककडे जाताना असणाऱ्या शेवटच्या अपघाती वळणावरून कार कोसळण्याची घटना घडली. विनय शहा (४५) रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड हे शिंदे येथील युनिडेरिंटेंट लिमिटेड या कारखान्यात व्यवस्थापक आहेत. कामानिमित्त ते पुणे येथे गेले होते. आपल्या होंडा सिटी कार क्र. एम.एच.१२ सी.टी. ३१०५ मधून ते नाशिककडे जात असताना त्यांची कार रस्ता सोडून व संरक्षक कठडे ओलांडून थेट ५० फूट खोल खड्यात कोसळली.

कार हवेत गिरक्या घेत दोन ठिकाणी जमिनीवर आदळल्याने चोहोबाजुंनी चेपली गेली होती. सीटबेल्ट बांधलेला असल्याने व एअरबॅग ओपन झाल्यामुळे मोठा अपघात होऊनही ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्या एका पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समजते. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाश्यांनी धाव घेत त्यांना तात्काळ नाशिक येथे खाजगी रुग्णालयात हलवले.
दरम्यान अपघाताबाबत शहा यांनी कारखान्यात सहकाऱ्यांना माहिती दिल्यावर कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत कारमधील लॅपटॉप, शहा यांचा मोबाइल फोन, महत्वाची कागदपत्रे आदी साहित्य ताब्यात घेतले. अपघात घडल्यावर दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाली होती.

कारची झालेली अवस्था पाहता मोठ्या जीवित हानीची भीती प्रत्यक्षदर्शी व्यक्त करत होते. मात्र चालक सुरक्षित असून किरकोळ जखमी असल्याचे समजल्यावर कुणाचा त्यावर विश्वासही बसत नव्हता. महामार्ग पोलिसांच्या पथकाने धाव घेत वाहतूक सुरळीत करतानाच अपघातग्रस्त वाहन सुरक्षित ठिकाणी हलवले. रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

क्रश बॅरिकेट्सची दुरावस्था

महामार्गावर व घाटात असणाऱ्या वळणांवर अपघात प्रतिबंधक क्रॅश बॅरिकेट्स बसवण्यात आले आहेत. संपूर्ण पणे लोखंडी असलेल्या या बॅरिकेट्समुळे अपघात झालाच तर वाहन रस्त्याच्या खाली उतरू नये व त्याचा वेग नियंत्रित व्हावा हा हेतू यामागील आहे. आज अपघात झाला त्या वळणावर यापूर्वी देखील उतार व वळणाचा अंदाज येत नसल्याने तीन-चार वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. महिनाभरापूर्वी याच ठिकाणी कापसाचा ट्रक पलटी झाला होता.

या ट्रॅक ला झालेल्या अपघतात सुमारे ५० फूट लांबीपर्यंतचे क्रॅश बॅरिकेट्स उखडले गेले होते. मात्र अद्यापपर्यंत हे बॅरिकेट्स पूर्वस्थितीत बसवले न गेल्याने या जागेवर अपघात वाढले आहेत. महामार्ग प्राधिकरण विभागाने सदर बॅरिकेट्स तातडीने बसवावेत, अपघाती वळणावर वाहनांच्या वेगाला नियंत्रित करण्यासाठी साखळी पद्धतीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी प्रवासी व वाहनधारक करीत आहेत.  

LEAVE A REPLY

*