लासलगावी मिरचीपूड टाकून लूट; स्वत: कांदा व्यापाऱ्यानेच रचला लुटीचा बनाव

0

नाशिक, ता. २५ : दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथे कांदा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याला लुटण्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र हा प्रकार बनाव असून तो स्वत: त्या व्यापाऱ्यानेच रचल्याची माहिती आज नाशिक ग्रामीण पोलिसांकडून समजत आहे.

दिनांक २३ एप्रिल रोजी लासलगाव येथे अॅक्सिस बँकेजवळ कांदा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकून नऊ लाख लुटल्याची घटना दुपारी घडली होती. राहुल सानप असे या व्यापाऱ्याचे नाव असून ते विंचूर येथील रहिवासी आहेत.

शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापाऱ्याने बँकेतून पैसे काढले होते. त्याच्यावर नजर ठेवत दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी  सानप गाडीत बसताच मिरचीची पूड डोळ्यांवर फेकली. त्यानंतर गाडीतील रोकड ठेवलेली पिशवी घेऊन पोबारा केला असा बनाव सानप यांनी रचला होता.

लासलगावातील वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी लासलगावमधील व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविला होता.

दरम्यान राहुल सानप याने सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्ष तपास यात विसंगती आल्याने पोलिसांनी त्याचीच चौकशी केली असता कर्जबाजारीपणामुळे त्यानेच आपल्या दोन नातेवाईकांसह हा बनाव रचला असल्याचे उघडकीस आले.

सदर कटात त्याच्यासोबत त्याचा मावस भाऊ अभिजित भाऊसाहेब सानप, रा. निमगाव, ता. सिन्नर आणि साथीदार रमेश नामदेव सानप, रा. पाचोरे बु. ता. निफाड हे सामील असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले.

असा घडविला चोरीचा बनाव

गुन्हयातील फिर्यादी राहुल शंकर सानप हे शेतीमालाचे व्यापारी असुन त्यांचेवर मर्चंट बँक व व्यापा-यांचे कर्ज होते. त्यांनी दि.23 एप्रिल रोजी लासलगाव येथील अ‍ॅक्सिस बँकेतून धनादेशाने 09 लाख रूपये काढले होते, परंतु कर्जबाजारी झाल्याने सदरचे पैसे चोरी झाल्याचा बनाव करण्याचा प्लॅन फिर्यादी राहुल सानप यांनी केला होता.

बँकेतून काढलेले पैसे चोरीस गेले असल्याचा बनाव करण्यासाठी, त्यांनी सोमवारी दि. 23 एप्रिल रोजी अ‍ॅक्सिस बँकेतुन 09 लाख रूपये काढले व गाडीचे पुढील सिटवर ठेवले.

विंचुर रोडने पुढे जाताना गाडीचे टायर पंक्चर झाले असल्याचे बहाण्याने ते खाली उतरले, व सदर ठिकाणी त्यांचा मावस भाऊ अभिजीत यास पल्सर मोटर सायकलवर येण्यास सांगितले, तसेच त्याचेकडे मिरचीची पुड देवुन गाडीजवळ आल्यावर झटापट करून मिरचीची पुड डोळयात टाकायची व गाडीचे सीटवरील पैशांची बॅग लुटमार करून घेवुन जायची, तसेच साथीदार रमेश याने घटना घडलेनंतर त्यास दवाखान्यात घेवुन जायचे असे ठरले.

त्याप्रमाणे त्याचा मावस भाऊ अभिजीत याने राहुल याचे डोळयात मिरचीची पुड टाकली व गाडीचे पुढील सिटावरील पैशांची बॅग लुटली आहे, तसेच साथीदार रमेश याने ठरलेप्रमाणे फिर्यादीस दवाखान्यात उपचारासाठी दाखल करत हा बनाव रचला.

फिर्यादी राहुल सानप याने कर्जबाजारी झाल्यामुळे पैसे चोरी गेल्याचा बहाना करून त्यांचे कुटूंबियांची फसवणुक केली आहे, तसेच यातील फिर्यादीचा मावस भाऊ अभिजीत सानप यास फिर्यादीकडुन 02 लाख रूपये घेणे असल्याने त्यास कटात सामील करून पैसे परत देणार असल्याचेही सांगितले होते.

दरम्यान या प्रकरणी राहुल शंकर सानप, वय 28, बु॥, ता.निफाड, 2) अभिजीत भाउसाहेब सानप, वय 26, रा. निमगाव, ता.सिन्नर, 3) रमेश नामदेव सानप, वय 27, रा. पाचोरे बु॥, ता.सिन्नर यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे  ताब्यातून चोरीस गेलेले 08 लाख रूपये हस्तगत करण्यात आले आहे. जप्त मुद्देमाल व संशयीतांना गुन्हयाचे पुढील तपासकामी लासलगाव पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणी नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि जनार्दन सोनवणे, सपोनि अशिष आडसुळ स्थागुशा, पोउनि डी.एस.मुढे लासलगाव पो.स्टे. तसेच स्थागुशाचे सपोउनि रविंद्र शिलावट, जिवराज इलग, पोहवा भगवान निकम, पोना नंदु काळे, राजु सांगळे, पोकॉ संदिप लगड, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोउनि जोपुळे, पोना महाजन, शिंदे, पोकॉ आजगे यांच्या पथकाने सदर जबरी चोरीचे गुन्हयाचा उलगडा करून वरील संशयिताना ताब्यात घेतले.

 

LEAVE A REPLY

*