दोन लाख कृषीपंपाचे वीजबील थकीत

कृषी संजीवनी योजनेत : 85 हजार शेतकर्‍यांनी भरले 40 कोटी रुपये

0

 नाशिक । दि. 27 प्रतिनिधी

राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली असून  नाशिक जिल्ह्यातील 84 हजारपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी त्यांच्या वीजबिलाचे 39 कोटी 35 लाख महावितरणकडे भरले आहेत.

उर्वरित 2 लाख 20 हजार कृषिपंप ग्राहकांनी अजूनही त्यांचे चालू बिल भरलेले नाही. या ग्राहकांनी 30 नोव्हेंबरच्या आत त्यांचे चालू वीजबिल भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग व सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

नाशिक परिमंडलातंर्गत येणार्‍या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 62 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 3 हजार 468 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 3 लाख 5 हजार शेतकर्‍यांकडे वीजबिलाची 1183 कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता 766 कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे.

योजना जाहीर होण्यापूर्वी कृषिपंपाचे वीजजोड तोडण्याची मोहीम ऑक्टोबर-2017 अखेर हाती घेण्यात आली होती. तेंव्हापासून 21 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 84 हजार 519 शेतकर्‍यांनी 39 कोटी 34 लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे.

मालेगाव मंडलातील मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण विभागातील 43 हजार 771 शेतकर्‍यांनी 18 कोटी 30 लाख तर नाशिक शहर मंडलातील नाशिक शहर एक आणि दोन, नाशिक ग्रामीण व चांदवड विभागातील 40 हजार 748 शेतकर्‍यांनी 21 कोटी 7 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतून कृषिपंप ग्राहकांना थकीत बिलावरील व्याज व दंड यात शंभर टक्के सवलत मिळणार असून केवळ मूळ थकबाकी भरावयाची आहे. सर्वच शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेतल्यास 417 कोटी रुपयांची सवलत मिळू शकणार आहे.

योजनेनुसार 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच सामान हप्ते करून ते दर तीन महिन्यांनी चालू बिलासोबत तर 30 हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्ते दर दीड महिन्यांनी चालू बिलासह भरावे लागणार आहेत.

डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या एक वर्षाच्या कालावधीत हप्ते भरून थकबाकीमुक्त होण्याची संधी या योजनेने सर्व शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता  कुमठेकर यांनी केले आहे.

25 हजार ग्राहकांनी बिलच भरले नाही

वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबीलाची रक्कम न भरलेल्या नाशिक जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या 25 हजाराच्या घरात आहे. यात मालेगाव मंडलातील 13 हजार 362 तर नाशिक शहर मंडलातील 11 हजार 466 ग्राहकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*