‘कृषी संजीवनी’कडे शेतकर्‍यांची पाठ

0

नाशिक । दि. 29 प्रतिनिधी
कृषीपंपाच्या थकित बिल समान हप्त्यामध्ये भरता यावे, याकरिता शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागासाठी शेतकर्‍यांमध्ये उदासीनता दिसून आली.

नाशिक परिमंडळातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील 6 लाख कृषी ग्राहकांपैकी अवघ्या 1 लाख ग्राहकांनीच या योजनेत सहभाग नोंदवला. उद्या गुरुवारी (30 नोव्हेंबर) संपत असून किमान ठराविक रक्कम भरून थकबाकीदार शेतकर्‍यांनी योजनेतील आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

नाशिक परिमंडलातंर्गत येणार्‍या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 62 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 3 हजार 468 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील 1 लाख 67 हजार ग्राहकांनी आतापर्यंत योजनेत सहभाग नोंदवला असून त्यांनी 70 कोटी 20 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

यात नाशिक शहर मंडलातील 46 हजार 537 कृषिपंप ग्राहकांनी 24 कोटी 25 लाख, मालेगाव मंडलातील 47 हजार 500 शेतकर्‍यांनी 19 कोटी 47 लाख तर अहमदनगर मंडलातील 72 हजार 300 कृषी ग्राहकांनी 26 कोटी 48 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

मुख्यमंत्री कृषी संजीवनीत सहभाग घेणे सोईचे व्हावे, यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. वीजबिलाची 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असणारे शेतकरी तीन हजार तर 30 हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले शेतकरी पाच हजार रुपये भरून योजनेतील सहभाग निश्चित करू शकतात.

मात्र त्यासाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची संधी असून थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांनी तातडीने भरणा करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. वीज बिलाबाबतच्या

कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी 1 ते 31 डिसेंबरपर्यंत फिडरनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून कृषिपंप ग्राहकांना बिलासंदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण करून घेता येईल.

LEAVE A REPLY

*