विशेष लेख : खरीपातील पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय

0

खरीप पिकांवर पडणाऱ्या रोगांचा कसा सामना करायचा? याबाबत तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला. हा लेख केवळ मार्गदर्शनासाठी असून आपल्या पिकावर अंमलबजावणी करताना आपल्या येथील पिकाची अवस्था, भौगोलिक हवामान या गोष्टींचा विचार करूनच शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. शक्य झाल्यास आपल्या परिसरातील कृषी तज्ज्ञ, कृषी सहायक यांचीही मदत घ्यावी – संपादक

भातावरील करपा – रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १२ दिवसाच्या अंतराने कॉपर ऑक्सिक्लोराईड १२५० ग्रॅम/ हेक्टरी किंवा कार्बेन्डाझिम ५०० ग्रॅम/ हेक्टरी फवारणी करावी.

भातावरील कडा करपा – रोगाच्या तीव्रतेनुसार कॉपर ऑक्सिक्लोराईड १२५० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन ७५ ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

मुग आणि उडीद वरील भूरी रोग – १० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ५ मिलि पेनकोनॅझोल किंवा ३० ग्रॅम विद्राव्य गंधक किंवा १० मिलि डिनोकॅप १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

कपाशीवरील जिवाणूजन्य करपा – १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. १० दिवसाच्या अंतराने ५% निंबोळी अर्काच्या तीन फवारण्या केल्यास ते जिवाणूजन्य करपा रोगाचे नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपर ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशकाइतकेच प्रभावी ठरते.

कपाशीवरील दहिया रोग – रोग नियंत्रणासाठी उपलब्धतेनुसार ३०० मेश गंधकाच्या भुकटीची हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा २५ ग्रॅम विद्राव्य गंधक १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सकाळी किंवा दुपारनंतर फवारणी करावी. किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कपाशीवरील लाल्या – मॅग्नेशियम सुक्ष्म अन्नद्रव्य २० ते ३० किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. तसेच १% पोटॅशियम नायट्रेट किंवा ०.३% मॅग्नेशियम सल्फेट किंवा ०.३% झिंक सल्फेट एक फवारणी फुले धरण्याच्या अवस्थेत व दुसरी फवारणी बोंडे धरण्याच्या अवस्थेत करावी. सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी २% युरिया व २% डी.ए.पी. सोबत दिला तरी चालतो.

सोयाबीनवरील तांबेरा – प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल यापैकी एका बुरशीनाशकाची १० मिलि १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

सोयाबीनवरील मोझॅक – या रोगाचा प्रसार रसशोषक किडीमार्फत होत असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३०% प्रवाही १० मिलि १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

केळीवरील सिगाटोका करपा रोग – प्रोपीकोनॅझोल ५ मिलि अधिक पेट्रोलजन्य खनिज तेल १०० मिलि प्रति १० लिटर पाणी या द्रावणाची पहिली फवारणी रोगाची लक्षणे दिसताच व नंतरच्या दोन फवारण्या २० दिवसाच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारणी करावी.

अंजिरावरील तांबेरा – १० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक क्लोरोथॅलोनील २० मिलि किंवा प्रोपीकोनॅझोल १० मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सीताफळावरील फळसड – बोर्डोमिश्रण १% किंवा कार्बेन्डाझिम ०.१% अधिक मॅन्कोझेब ०.२०% यांची फळधारणेनंतर दर १५ दिवसांनी फवारणी करावी॰

द्राक्षावरील केवडा रोग – केवड्याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील – मॅन्कोझेब (०.२%) किंवा सायमोक्झॅनील – मॅन्कोझेब (०.२%) किंवा फिनॅमिडॉन – मॅन्कोझेब (०.२५%) किंवा अझोक्जीस्ट्रॉबीन (२०० मिलि/ एकर) किंवा फेमॉक्झॅडोन + सायमोक्झॅनील (२०० मिलि/ एकर) किंवा क्रिसॉक्झिम मेथील (२५० मिलि/ एकर) किंवा पायरॅक्लॉस्ट्रॉबीन + मेटीरॅम (१.७५ ग्रॅम/ लीटर) या बुरशीनाशकाच्या फवारण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून कराव्यात.

द्राक्षावरील भूरी रोग – भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८०% पाण्यात विरघळनारे गंधक २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मिलि किंवा ट्रायडेमिफॉन २५ ग्रॅम किंवा पेंकोनॅझोल ५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संत्रा वरील डिंक्या – रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतुक केलेल्या पटाशीने किंवा चाकूने काढून रोगट भाग १% पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक करावे व त्याच्यावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. त्याचप्रमाणे बागेतील झाडावर रीडोमील (एम-झेड ७२) किंवा एलिएट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

संत्रा व लिंबू वरील कॅंकर किंवा खै-या – नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये एक महिण्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात व चौथी फवारणी फेब्रुवारी महिण्यात करावी.

टोमॅटो वरील करपा रोग – मॅन्कोझेब ०.२५% (२ फवारण्या) आणी टेबुकोनॅझोल ०.०५% (२ फवारण्या) आलटून पालटून १५ दिवसांनी फवारणी करावी॰

कांदावरील करपा – मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनील (२.५%) १५ दिवासाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

वांगी वरील पानावरील ठिपके, फोमोप्सिस फळसड – मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १० ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारावे.

– डॉ. राजेश राठोड, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) , तुषार आहिरे, कार्यक्रम सहायक, डॉ. दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक,

LEAVE A REPLY

*