जलयुक्तच्या कामांबाबत यंत्रणेची चालढकल

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात झालेल्या कामांमुळे पाणी साठवणुक क्षमतेत वाढ होऊन जिल्ह्याला नवसंजीवनी मिळाली आहे.

दोन वर्षातील योजनेची यशस्वीता बघता सलग तिसर्‍या वर्षीही योजनेतील कामांना गती मिळणे अपेक्षित होते. परंतु, यंत्रणांच्या चलाढकलमुळे सद्यस्थितीत केवळ 124 कामेच सुरू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

जिल्ह्यात चालू वर्षी जलयुक्त शिवारसाठी दोनशे गावांची निवड झाली असून एकुण 4 हजार 439 कामांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात यातील 50 टक्के कामांना तांत्रिक मंजूरी देत ती सुरू होणे अपेक्षित होते. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी देखील वारंवार यंत्रणांना सुचना दिल्या होत्या.

मात्र, अधिकार्‍यांमधील लालफितीचा कारभारात संबंधित कामे अडकल्याने आत्तापर्यंत केवळ 124 कामांचाच शुभारंभ झाला आहे. तालुकास्तरावर अनेक प्रस्ताव प्रलंबीत असल्याची माहिती मिळते आहे.

त्यातही मागील वर्षाची पाच ते दहा टक्के कामे अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहेत. त्यामूळेच जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी ठरलेल्या योजनेचे भवितव्यच सध्या अंधारमय झाले आहे.

गत आर्थिक वर्षात 219 गावांमध्ये 6 हजार 158 कामे हाती घेण्यात आली होती. त्यात नाला खोलीकरण व रूंदीकरण, विहिर पुर्नभरण, सिमेंन्ट बंधारे बांधणे अशा विविध कामांचा समावेश होता.

ही कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र, सरकारी यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे यातील 5 ते 10 टक्के कामे अद्यापही शिल्लक आहेत.

सरकारने गतवर्षातील अपुर्ण कामे करण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत दिली असून त्याचबरोबर चालूवर्षातील 50 टक्यांपेक्षा अधिक कामे पुर्ण होणे अपेक्षित आहेत. त्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे.

अन्यथा योजनेत निवड झालेल्या गावांतील ग्रामस्थांंना भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल.

LEAVE A REPLY

*