ओखी नुकसानग्रस्तांसाठी सव्वादोन कोटींचा प्रस्ताव

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी
गेल्या महिन्यात 4 व 5 डिसेंबर रोजी ओखी चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांनाही चांगलाच फटका बसला असून, कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील 142 गावांना कमी-अधिक प्रमाणात या चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने झोडपून काढले आहे.

त्यात सुमारे 1500 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सुमारे सव्वादोन कोटींच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.

महाराष्ट्रातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सूर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधूनमधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या. त्यामुळे काढणीवर आलेल्या द्राक्षबागांवर मोठे संकट कोसळले.

काही ठिकाणी द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले तर झोडपणार्‍या पावसामुळे घडे कोसळून पडण्याच्या व मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले. खळ्यावर काढून ठेवलेला कांदा, मका भिजण्याचेही प्रकार घडले आहेत.

संपूर्ण राज्यातच ओखी वादळाने झोडपून काढल्यामुळे राज्य सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उशीराने काढले. त्यामुळे कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्याविषयीही संशय घेतला जात आहे.

त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील चांदवड, बागलाण तालुक्यातील सुमारे 1231 हेक्टरवरील द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात 20 हेक्टर क्षेत्रावरील कारले पिकाचे नुकसान झाले.

मात्र पावसाच्या या तडाख्यापासून तुर वाचल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार 1506 शेतकर्‍यांचे 1295 हेक्टरवर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसल्याचे दिसून येते.

मदतीचे निकष असे
शासनाने ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना बागायत पिकांखालील क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत 13,500 रुपये, तर फळपिकाखालील क्षेत्रासाठी 18,000 रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई पोटी दोन कोटी, 33 लाख 8,290 रुपयांची गरज आहे. कृषी खात्याने अंतिम पंचनामे करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर केला असून, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*