Video : भर उन्हात सिग्नलवर ‘त्या’ नाशिककरांना आला यमराजाचा अनुभव

0

नाशिक, ता. १२ : कडकडीत उन्हामुळे सर्वच हैराण झालेले. जेहान सर्कल सिग्नलवर तर एकही झाड किंवा सावली नाही. शिवाय हा सिग्नल जास्त सेकंदाचा असल्याने केव्हा एकदा सिग्नल संपतो याकडे उन्हामुळे त्रासलेल्यांचे लक्ष असते.

…अशातच अचानक विराट हास्याचा आवाज काही दुचाकीस्वारांच्या कानावर पडतो आणि क्षणात काळजाचा ठोका चुकतो, कारण समोर प्रकट होतात चक्क काळ्या कपड्यातील, अक्राळविक्राळ रूपातील यमराज.  यमराज पहाडी हास्य करतो आणि म्हणतो चला माझ्यासोबत…

‘तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर चला माझ्यासोबत…’ असे हा यमराज म्हणतो आणि गडबडीत असलेल्या दुचाकीस्वाराच्या खरा प्रकार लक्षात येतो. त्याच्यासोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही मग हेल्मेटचे महत्त्व दुचाकीस्वाराला समजावून सांगतात. अलीकडेच हा अनुभव शहरातील वाहन धारकांना आला.

जेहान सर्कलसह सध्या अनेक चौकात पोलिसांकडून हेल्मेटचा वापर करणे, चारचाकीत बसल्यावर सीटबेल्टचा उपयोग करणे याबद्दल जागृती सुरू आहे. त्यासाठी काही शाळकरी मुलेही यमराज बनून लोकांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगत आहे. इतकेच नव्हे, तर ज्यांनी हेल्मेट घातले, त्या वाहनचालकांना मी तुम्हाला माझ्यासोबत नेणार नाही असेही सांगत यमराज आश्वस्त करत आहे.

अपघाताच्यावेळी डोक्यावर हेल्मेट असल्यास गंभीर दुखापत किंवा प्रसंगी मृत्यू ओढविण्याच्या घटना होण्याचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांकडील अपघात नोंदीवरून समजते. आतापर्यंत ज्या दुचाकीस्वारांचे मृत्यू अपघातात झाले आहेत, अपवाद वगळता त्यातील बहुतेक सर्व मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

म्हणूनच हेल्मेट घालून दुचाकी चालविणे हे नियमांसाठी किंवा दंड भरावा लागू नये म्हणून नव्हे, तर स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. चारचाकी चालवितानाही वाहकासह सहप्रवाशांनी सीटबेल्ट लावणे सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरते.

दरम्यान वाहतुक सुरक्षेबद्दल जागृती करण्याची यमराजाची ही संकल्पना लोकांच्याही पचनी पडत असून अनेक वाहनचालक आपण हेल्मेट वापरू असा संकल्प करत आहेत. नाशिक पोलिसांची वाहतुक शाखा आणि सामाजिक संस्थांमार्फत हा उपक्रम या पूर्वीही शहरात राबविला होता. सध्या या संदर्भातील संदेश आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

*