‘जीएसटी’तही कारागृहाची विक्रमी भरारी!

0
नाशिकरोड । प्रतिनिधी- शासनाने जीएसटी लागू केल्यानंतर अनेक उद्योग व्यवसायांचे कंबरडे मोडले. मात्र, जीएसटी लागू होऊनही येथील मध्यवर्ती कारागृहाने 2017-18 वर्षात 6 कोटी 14 लाख 37 हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. शेतीतूनही 40 लाखांचे उत्पन्न प्राप्त करत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. गेल्या वेळी या कारागृहाला 5 कोटी 75 लाख 46 हजाराचे उत्पन्न मिळाले होते. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी व कारखाना प्रमुख पल्लवी कदम यांनी ही माहिती दिली.

ब्रिटिशांनी 1927 साली नाशिकरोड हे भव्य कारागृह बांधले. येथे साडेतीन हजार कैदी आहेत. राज्यात नाशिकसह नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. मध्यवर्ती कारागृहात महसूलसाठी विविध कारखाने, उपक्रम असतात. नाशिकरोड कारागृहाचे दोनशे एकरवर क्षेत्र आहे. मुख्य कारागृहात नऊ कारखाने चालतात. त्यामध्ये विणकाम, सुतारकाम, शिवणकाम, चर्मकला, बेकरी, लोहकाम, धोबीकाम, रसायन, मूर्ती विभागाचा समावेश आहे. शेती विभाग वेगळा आहे. या सर्व विभागात पक्के कैदी काम करतात. त्यांना या कामाचे वेतन मिळते.

पोलिस मोठे ग्राहक
महाराष्ट्र पोलिस हे नाशिकरोड कारागृहाचे मुख्य ग्राहक आहेत. पोलिसांना 40 हजार मच्छरदाण्या शिवणकाम विभागाने पुरविल्या, तर लोहकाम विभागाने पोलिसांसाठी तब्बल 60 हजार लोखंडी किटबाक्स तयार केले. हे काम 2015 पासून सुरू आहे. कारागृहातील पैठणीलाही मोठी मागणी आहे. एक पैठणी तयार करायला पंधरापेक्षा जास्त दिवस लागतात. आतापर्यंत शंभर पैठणींची विक्री झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे.
लंडनमधील स्वयंसेवी संस्थेला कारागृहाने सतरंज्या पुरवल्या होत्या. ही संस्था पुन्हा उत्सुक आहे. कारागृह प्रशासन दर्जाशी तडजोड करत नाही. विणकाम विभागाला दर्जेदार कच्चामाल न मिळाल्याने काम अऩेक दिवस बंद होते. या वर्षा अमरावती कोर्टाची 83 लाखांची फर्निचरची मागणी असून काम सुरू आहे. नंदुरबारचीही 37 लाखांची मागणी आहे.

ब्रॅन्डिंगचा प्रयत्न

शुद्धता, दर्जा, टिकाऊपणा आदींबाबत कारागृहाच्या वस्तू नंबर वन आहेत. त्यांचे आतापर्यंत ब्रॅन्डिंग, प्रसिद्धी होत नव्हती. आता त्यावर भर दिला जात आहे. दोन वर्षापूर्वी मंत्रालयातील प्रदर्शनात भाग घेऊन हे कारागृह अव्वल आले. नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनातही स्टॉल लावण्यात आला होता. यंदा नाशिक वाईन फेस्टिवलमध्ये कारागृहाने लावलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. कारागृह गेटवर दिवाळी मेळ्यात यंदा साडेचार लाखांच्या वस्तू विकल्या.

रक्षाबंधन मेळ्यातही मोठी विक्री झाली. कारागृहात प्रथमच मूर्ती विभाग सुरू झाला. त्यामध्ये तयार झालेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती उत्सवापूर्वीच संपल्या. त्यामुळे आगामी उत्सवासाठी अकरा महिन्यापूर्वीच मूर्तीकाम सुरू झाले असून, दोन हजार मूर्ती तयार केल्या जाणार आहेत.

कारागृह उपाशी…!

इगतपुरी तालुक्यातील लोकांना धरणे असूनही पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही भटकावे लागते. तशीच अवस्था नाशिकरोड कारागृहाची आहे. हे कारागृह कल्पक उपक्रम राबवून दरवर्षी विक्रमी महसूल मिळवते. कारागृहाच्या विकासासाठी हा महसूल वापरता येत नाही. तो राज्य शासनाकडे जमा करावा लागतो. नंतर अनुदान स्वरूपात कारागृहाला निधी येतो. कारागृहाचे अनेक चांगले प्रकल्प, विकासकामे लालफितीच्या कारभारामुळे रखडली असून, निधी वेळेवर मिळत नाही.

शिवणकाम आघाडीवर

यंदा नऊ विभागांमध्ये शिवणकाम विभागाने 1 कोटी 89 लाख 38 हजारांचे उत्पन्न मिळवून प्रथम क्रमांक, लोहकाम विभागाने दुसरा (एक कोटी 47 लाख) तर सुतारकाम विभागाने तिसरा (1 कोटी 44 लाख) क्रमांक मिळवला. पैठणीसाठी प्रसिध्द विणकाम विभागाने 66.36 लाखांचा तर दर्जेदार साबण, दंतमंजन, फिनेल तयार करणार्‍या रसायन विभागाने 37.43 लाखांचे उत्पन्न मिळवले. बेकरीने 15 लाख, धोबी विभागाने साडेसहा लाख, मूर्ती विभागाने पावणे सहा लाख, चर्मकलाने सव्वादोन लाखांवर उत्पन्न मिळवले.

LEAVE A REPLY

*