शाळेचा पहिला दिवस; कागदावर घेणार ‘बालकाच्या पायाचा ठसा’

आज काढणार मशाल दिंडी

0

नाशिक (विशेष प्रतिनिधी), ता. १४ :  उद्या दिनांक १५ जून रोजी राज्यातील शाळांना सुरूवात होणार असून जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा विभागाने जय्यत तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी शाळेत १०० टक्के उपस्थिती असावी यासाठी शिक्षण विभागाने विविध पातळ्यांवर प्रचाराची तयारी चालविली आहे.

जिल्हा परिषदेतर्फे सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या बालकांची यादी आज गावातील तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी लावण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत. आज सायंकाळी गावातून मशाल दिंडी काढायची असून त्यात नवोगत बालकांच्या पालकांचाही समावेश करून घ्यायचा आहे. याशिवाय गावात दवंडी द्यायची असून घराघरात जाऊन शिक्षकांनी शाळेबद्दल माहिती सांगायची आहे.

जिल्हा परिषदच्या काही शाळांना आयएसओ दर्जा मिळाला असून या शाळांनी आपल्या शाळेतील उपक्रम आणि सुविधा यांच्याबद्दल माहिती देणारे पत्रक तयार करून ते पालकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून विद्यार्थीसंख्या वाढविण्याचा शाळांचा प्रयत्न आहे.

दरम्यान आजच सर्व शाळांची साफसफाई करण्यात आली असून पाठ्यपुस्तकांचे वाटपही आजच करण्यात येत आहे. उद्या सकाळी पहिलीतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. वर्गखोल्या सजविणे, वर्गांना तोरण बांधणे, गावातून चित्ररथांसह घोषणांसह वाजतगाजत प्रभातफेरी काढणे, नवीन प्रवेश केलेल्या बालकांना वाजत गाजत बैलगाडी अथवा खांद्यावरून मिरवणूकीने शाळेत आणणे, त्याचे फुले देवून आणि औक्षण करणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहे. तसेच संबंधित बालकाच्या पायाचा ठसा कागदावर घेतला जाणार असून तो जतन करून शाळा सोडतेवेळी दाखल्यासोबत तो देण्यात येण्याचा अभिनव उपक्रमही जि.प. शाळांमध्ये राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या पहिल्याच दिवशी माध्यान्ह भोजनात शिरा किंवा लापशी असा गोड पदार्थ विद्यार्थ्यांना खाण्यास मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*