मालेगाव, बागलाणमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; नाशिक शंभरीच्या उंबरठ्यावर

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विकासासाठी कल्याणकारी योजनांचा दावा करणार्‍या भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांचा आलेख उंचावताना दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.

चालू वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात 99 शेतकर्‍यांनी  कर्जबाजारीपणास कंटाळून जीवनयात्रा संपवली आहे. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. जुलै महिन्यात कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरसुद्धा 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कर्जमाफीची घोषणा शेतकर्‍यांना दिलासादायक ठरलेली नाही. घेतलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी जीवन संपवत आहेत तर दुसरीकडे कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादी पडताळणीचे काम अजूनही संपलेले नाही.

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध घोषणा करण्यात आल्या. सोबतच उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्याही वल्गना झाल्या. सिंचनाची व्यवस्था, सुरळीत वीजपुरवठा करणार, अशी ग्वाहीही दिली गेली. मात्र तीन वर्षांनंतर वास्तव वेगळेच दिसून येत आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालास भाव मिळत नाही.

या समस्या आजही कायम आहेत. त्या कमी व्हाव्यात म्हणून कर्जमाफीची घोषणा झाली. त्याला पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीदेखील बहुतेक शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर 99 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यातील 51 आत्महत्यांची प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. उर्वरित 42 प्रकरणे अपात्र ठरली. 2016 या वर्षात 86 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यंदा यात त्यात 13 ने वाढ होऊन आतापर्यंत 99 शेतकर्‍यांनी जीवन संपवले आहे. मालेगाव, निफाड, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय आत्महत्या

नाशिक 3, बागलाण 13, चांदवड 10, सिन्नर 6, देवळा 1, दिंडोरी 11, मालेगाव 15, नांदगाव 11, निफाड 12, त्र्यंबकेश्वर 3, येवला 6, सुरगाणा 1, कळवण 7

LEAVE A REPLY

*