‘ईद-ए-मिलाद’ निमित्त आज शहरात जुलूस

0

 जुने नाशिक । दि. 1 प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर साहेबांची पवित्र जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा मोठा सण शहर परिसरातील मुस्लिम बांधव उद्या साजरा करीत आहे.

यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज रात्रभर अनेक मशिदींमध्ये विशेष कार्यक्रम सुरू होते. तर उद्या दुपारी 3 वा. चौक मंडई येथून जुलुस-ए-मिलादची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ईद-ए-मिलाद निमित्त शहर परिसरातील मशिदी, दर्गा शरीफसह घरे व दुकानांवर तसेच मिरवणूक मार्गावर भव्य विद्युत रोषणाई करुन सजावट करण्यात आली आहे. यामुळे परिसर झगमग करीत आहे.

उद्या दुपारी 3 वा. चौक मंडई येथील जहांगीर चौकातून जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे. बागवानपुरा, मरहूम सलिम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवारपेठ, आदम शाह चौक, काझीपुरा, मुल्तानपुरा, बुरूड गल्ली, कोकणीपुरा, दख्नीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, हुसैनी चौक, पिंजारघाट आदी प्रमुख मार्गावरुन फिरुन मिरवणूक बडी दर्गा शरीफ येथे दाखल होणार आहे. इस्लामी पध्दतीने समारोपची प्रक्रिया होऊन भाविकांना नियाजचे प्रसाद वाटप होणार आहे.

मिरवणूक मार्गासह मुस्लिम बहुल भागात ईदसाठी साजवट करण्यात आली आहे. सर्वत्र हिरवेलाल झेंडे, पताकांसह धार्मिक चित्र असलेले फुले लावण्यात आले आहे. बडी दर्गा शरीफ भागात ‘अंब्रेला’ सजावट करण्यात आली आहे.अनेक ठिकाणी स्वागत कमानी देकील उभारण्यात आले आहे.

चौक मंडईत देखावा

‘ईद-ए-मिलाद’ च्या पार्श्वभुमीवर चौक मंडईत तरुणांच्या वतीने भव्य देखावा तयार करण्यात आला आहे. सुमारे 20 बाय 20 आकाराचे पवित्र मदिना शरीफची प्रतिकृती तयार करण्यात येऊन आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज सायंकाळपासून याला पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याच प्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देखील ठिकठिकाणी स्वागत फलक लावले आहे. तर विविध संस्था, गु्रप व नेत्यांच्या वतीने देखील शुभेच्छा फलक लावण्यात आले आहे. सणाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मिरवणुकीत इस्लामी पध्दतीने भाविकांनी सामील व्हावे, कोणत्याही प्रकारचा डीजे आणू नये, इतरांना त्रास होईल असे कृत्य करु नये, डोक्यावर टोपी घालून सलातोसलाम व दरुद शरीफचे पठण करीत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*