अहो आश्चर्यम्‌ : मेंढ्यांनी उघडकीस आणला ‘नाशिक भाई’ म्हणविणाऱ्या ठेकेदाराचा रस्ता भ्रष्टाचार

0

डुबेर, ता. सिन्नर (वार्ताहर) १४ :  मेंढ्यांमुळे रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे उघडकीस येण्याची आगळी घटना येथे घडली आहे.

पुरेशी खडी, माती आणि डांबर न टाकता स्वत:ला नाशिकचा भाई म्हणविणाऱ्या एका ठेकेदाराने रस्त्याचे निकृष्ट काम केले. मात्र एका मेंढपाळाच्या मेंढ्या तेथून गेल्यावर त्यातील खडी बाजूला होऊन खाली काहीच मटेरियल वापरले नसल्याचे उघडकीस आले.
खराब रस्त्यासह ग्रामस्थ

आपले उद्योग मेंढ्यांमुळे चव्हाट्यावर आलेले पाहून चिडलेल्या ठेकेदाराने संबंधित मेंढपाळाला चोप देत त्याच्याकडून १० हजार रूपये सक्तीने वसूल केले. ही घटना ग्रामस्थांना समजल्यावर सरपंचासह, पंचायत सदस्य व गावकऱ्यांनी पाहणी केल्यावर त्यांना धक्काच बसला. रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाल्याचे उघडकीस आले.

पंचायत समिती निधीतून पाटोळे ते डुबेरे शिवरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. साधारण 1 किमी अंतराचे हे काम असून ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे.

रस्त्यावर पसरण्यात आलेली खडीही रोलरने दाबली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणी देखील पुरेशाप्रमाणात मारले नसल्याने हाताने खडी उघडी पडत असून अक्षरशः धुराळा उडत आहे. डांबराचा नावालाच फवारा मारल्याचे दिसत असून त्यामुळे निकृष्ट कामाचा उत्तम नमुना ठरवा असेच हे काम दिसून आले आहे.

दरम्यान,  हे काम सुरू असताना मेंढ्या या कामावरून गेल्याचे कारण पुढे करीत ठेकेदाराने मेंढपाळाला चोप देत त्याच्याकडून 10 हजार रुपये वसूल केल्याची चर्चा यावेळी रंगली होती.

आपल्या कामाचा सुमार दर्जा झाकण्यासाठीच ठेकेदाराने गरीब मेंढपाळाला मारहाण केली असल्याचा आरोप कैलास ढोली यांच्यासह ग्रामस्थानी केला आहे.

आज (दि.14) सरपंच अश्विनी वारुंगसे, उपसरपंच अनिल वारुंगसे, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर वाजे, सुनील वारुंगसे, कैलास ढोली, विशाल ढोली, खंडू ढोली, विकास ढोली, वसंत सांगळे, संदिप ढोली, रविंद्र ढोली, रामेश्वर माळी, अर्जुन कराड, राजेंद्र मंडलिक, संदीप रेवगडे, रविंद्र बी. ढोली, दिनकर ढोली, अरुण ढोली, अशोक ढोली, नवनाथ ढोली, सौरभ आगळे, योगेश वाजे, प्रमोद बोचरे, रोहित ढोली, उत्तम ढोली, अमोल ढोली, समाधान ढोली, रामेश्वर माळी यांच्यासह ग्रामस्थांनी कामाची पोलखोल करीत सदर प्रकार आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कानावर घातला.

दादागिरी करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करत त्याला हे काम न करू देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

मी नाशिकचा भाई

सदर रस्त्याचे काम करणारा सांगळे नामक ठेकेदार नाशिकचा भाई असल्याचे सांगत असून दमदाटी करून काम उरकण्याचा त्याने सपाटा लावला असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*